Sharad Pawar has called a meeting : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, आता शरद पवार यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक होणार असून, या बैठकीत पक्षाची पुढील राजकीय भूमिका तसेच दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलीनीकरणावर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीत राज्यातील तसेच केंद्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. या भेटीनंतर पार्थ पवार अधिक सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यास सुरुवात केली असून संघटनात्मक पातळीवर संवाद वाढवला आहे. शरद पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्षातील वातावरणाचा आढावा घेतल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी बोलावलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना पुन्हा एकत्र आणण्याच्या शक्यतांवर चर्चा होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. याशिवाय आगामी काळात पक्षाची राजकीय दिशा काय असेल, महाविकास आघाडीबाबतची भूमिका काय असेल आणि बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये पक्षाची रणनीती कशी असावी, यावरही विचारमंथन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कुणालला आत्महत्या करायचीच नव्हती पण त्याच्या बापाने…, खवल्या डोंगरावरील चांदगुडे प्रकरणात मोठा खुलासा
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यानंतर विविध स्तरांवर दोन्ही गटांतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले. मात्र दोन्ही बाजूंनी वेळोवेळी या चर्चांचे खंडन केले आणि कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे चर्चांचा फक्त राजकीय स्तरावरच गाजावाजा झाला, मात्र त्यातून ठोस निष्कर्ष समोर आला नव्हता.
गेल्या काही महिन्यांत राज्य आणि केंद्र पातळीवर अनेक महत्त्वाच्या राजकीय भेटी झाल्या. जयंत पाटील आणि विनोद तावडे यांची भेट, तसेच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेली भेट यामुळेही राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्याचवेळी शरद पवार गट राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र शरद पवार यांनी वारंवार अशा चर्चांना फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली होती.
आता 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकी कोणती भूमिका निश्चित केली जाते, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत काही सकारात्मक संकेत मिळतात का आणि पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे राज्यातील राजकीय निरीक्षकांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे येणारे काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
