आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा वादग्रस्त कृतींमुळे नेहमीच चर्चेत असलेल्या बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य केलं आहे. (BJP) शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांना ताकद देण्याबाबत भाषण करताना त्यांनी चक्क आपलं कमिशन कार्यकर्त्यांमध्ये वाटल्याचं म्हटलं. त्यामुळेच, आज माझ्यासोबत सायकलवर फिरणारा कार्यकर्ता आज फॉर्च्यूनर कारमध्ये फिरतोय, असेही त्यांनी सांगितलं.
विशेष म्हणजे माझं 35 कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांसाठी दिल्याची जाहीर कबुलीच त्यांनी दिलीय. आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि कमिशनचा मुद्दा समोर आला आहे. चिखली मतदारसंघातील अनेक गावातील 600 विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयात रविवारी सायंकाळी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू
यावेळी संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. थेट माझ्या कमिशनचे 35 कोटी रुपये असा उल्लेख संजय गायकवाड यांनी केला आहे. शिवसेना आता सत्तरीच्या वर्षाकडे जात आहे, चिखली मतदारसंघ हा बुलढाण्यापेक्षा मजबूत होता. हळू हळू येथील कार्यकर्ता भाजपसोबत गेला. येथील रेखाताईंच्या तीन टर्म आमदारकीमध्ये सामान्य माणसाला कधीच त्रास झाला नाही. पण, आताच्या काळात.. मी पण आमदार आहे, महाराष्ट्रातील ताकदवर आमदार आहे.
मी कशाला कधीच घाबरत नाही. आमची ताकद सामान्य माणसांना पाठिंबा देण्यासाठी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वापरतो. आमच्या मतदारसंघात एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला. माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्यूनरमध्ये फिरतात. जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलंय, असे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं आहे. कार्यकर्त्यांनी स्ट्राँग व्हायला पाहिजे, तुम्ही स्ट्राँग झालं की आम्ही स्ट्राँग होणार, असे संजय गायकवाड यांनी म्हटलं. संजय गायकवाड यांनी केलेल्या कमिशनच्या वक्तव्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
