Download App

आता ठरलं! मुंबई ते नागपूर.. मनपा निवडणूक स्वबळावरच लढणार; ठाकरे गटाची घोषणा

Uddhav Thackeray Shivsena : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. या मोठ्या पराभवानंतर मविआत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. वादही होऊ लागले आहेत. आघाडीत राहायचं की नाही इथपर्यंत चर्चा येऊन ठेपल्या आहेत. यातच आता ठाकरे गटाने काँग्रेस आणि शरद पवार गटाला धक्का देणारा निर्णय घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. आता काय होईल ते होईल. आम्हाला एकदा स्वबळ आजमावून पहायचं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढणार आहोत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीत धुसफूस वाढली आहे. जागावाटपात उशीर झाल्याने निवडणुकीत पराभव झाला असे विधान काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले होते. जागावाटपात जो घोळ झाला त्याला नाना पटोले आणि संजय राऊत जबाबदार असल्याचा त्यांचा रोख होता. या मुद्द्यावरच भाष्य करताना संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

मविआत जुंपली, राऊतांनीही काडी टाकली, म्हणाले, काँग्रेसनेच १७ दिवस घोळ..

या निर्णयाची माहिती देताना राऊत म्हणाले, मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व महापालिकेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. मग काय होईल ते होईल? पण एकदा आम्हाला आमची ताकद आजमावून पाहायची आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबाबत आम्हाला संकेत दिले होते. आता आमचा असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार?

आघाडीत आणि विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा फटका निश्चितच बसतो. महापालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे लागतात असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, त्यांच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची भाषा करत असताना ठाकरे गटाच्या या गुगलीने दोन्ही काँग्रेसमधील नेते अचंबित झाले आहेत.

पुन्हा राजकीय भूकंप! शरद पवार गट लवकरच सत्तेत सहभागी होणार, शिवसेना नेत्याचा खळबळजनक दावा

संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. वडेट्टीवार आता बोलत आहेत. ते देखील जागावाटपाच्या बैठकांना हजर असायचे. शिवसेना राज्यातील एक प्रमुख पक्ष आहे. आता आमच्यावर टीका होत आहे. पण हरियाणात काँग्रेसबरोबर कोण होतं? तिकडे तर ते एकटेच होते. जागावाटपाचा काहीच घोळही नव्हता. तरी देखील पराभव का झाला? देशभरात काँग्रेसचा पराभव का होतो? जम्मू काश्मीर आणि पश्चिम बंगालमध्ये शिवसेना होती का? मग तिकडे काँग्रेसचा पराभव का झाला? असे खोचक सवाल राऊतांनी विचारले.

follow us