मुंबई : शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला अयोध्येला जाणार नसून नाशिकमधील काळाराम मंदिरामध्ये ते हा सोहळा साजरा करणार आहेत. त्यांनी स्वतःच याबाबत माहिती दिली. मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते सपत्निक आले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray will celebrate the inauguration of Shri Ram Temple in Nashik on January 22.)
ठाकरे म्हणाले, 23 जानेवारी रोजी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसी यावर्षी नाशिकमध्ये शिवसेनेचे शिबिर होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदान गोल्फक्लब येथे शिवसेनेची जाहीर सभा सुद्धा आम्ही घेणार आहोत. एक आनंदाची गोष्ट अशी आहे की, इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि जवळपास 25-30 वर्षानंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला त्या श्रीराम मंदिराच्या लोकार्पण होतं आहे. म्हणून आम्ही 22 जानेवारीला नाशिकमध्येच श्रीरामाचे दर्शन घेणार आहोत.
या मंदिराच्या प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता. राम हा माझा सुद्धा आहे, आमचा सुद्धा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथे श्रीरामाचे-लक्ष्मणाचे दर्शन घेऊ. त्यानंतर साडेसातच्या सुमारास प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गोदातीरी एक मोठी महाआरती करणार आहोत.
22 जानेवारीला कोण जाणार, कोणाला आमंत्रण येणार, कोण जाणार कोण येणार याच्यात मला अजिबात रस नाही. कारण हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे. माझी एकच विनंती, मी काही दिवसांपूर्वी पण केली होती, “की राम मंदिराच्या लोकार्पण हा कार्यक्रम पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा, त्याला राजकीय रंग येऊ नये आणि नंतर ज्यावेळेला मला आणि आम्हाला सर्वांना वाटेल तेव्हा अयोध्येलाही आम्ही जाऊ. पण आता मान पान याचा कोणी विचार न करता एक आनंदाचा क्षण आहे तो सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे, असेही आवाहन ठाकरे यांनी केले.