Manohar Joshi : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे (Manohar Joshi) आज निधन झाले. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर आज पहाटे तीन वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांच्या जाण्याने एक कट्टर आणि बाळासाहेबांच्या मुशीत (Balasaheb Thackeray) घडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय नेत्यांकडून मनोहर जोशींच्या आठवणींना उजाळा दिला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबद्ध आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. युती सरकारचे नेतृत्व जोशी सरांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, भूमिकांचा आदर करून वाटचाल करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. विविध पदांववरील कामांचा मोठा अनुभव त्यांच्याकडे होता. आज आपण हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशींना श्रद्धांजील वाहिली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबध्द आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड… pic.twitter.com/rM33OboPhh
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 23, 2024
नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभा अध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा, विधानपरिष, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याचा मान त्यांनी मिळवला. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे.
माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता.
नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले.
विधानसभा… pic.twitter.com/7HiTTeo26w— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 23, 2024
शिवसेनेचेज ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. शिवसेना पक्ष स्थापनेपासून पक्षसंघटनेत त्यांनी अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनानं मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. जोशी सरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली… pic.twitter.com/igdCKA5cvR
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 23, 2024
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेत राज्याच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनोहर जोशींना श्रद्धांजली अर्पण केली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टोक्ती आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी… pic.twitter.com/zXjAxncGXq
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 23, 2024
माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी तळमळ असलेला नेता हरवला. युती सरकारच्या काळात जोशी सरांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. सरांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला. अतिशय नम्र, हजरजबाबी आणि महाराष्ट्र तसेच मराठी माणूस यांच्याविषयी मनापासून तळमळ असलेला…
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 23, 2024
बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीचं आक्रमक पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरू राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होते जे मनोहर जोशींच्या रुपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. 1966 पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले असे राज ठाकरे म्हणाले.
मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली.
शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर… pic.twitter.com/ti8v3tJWzl— Raj Thackeray (@RajThackeray) February 23, 2024
मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तेव्हा एका ब्राह्मण व्यक्तीला मुख्यमंत्री केल्याबद्दल शिवसेनेवर टीका झाली. पण बाळासाहेबांनी कधीही कुणाची जात पाहिली नाही. त्यांना मनोहर जोशी यांच्या कर्तबगारीवर विश्वास होता. जोशी यांनी हा विश्वास सार्थ ठरवला. जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण केले, असे संजय राऊत म्हणाले. शिवसेनेच्या वर्तुळात मनोहर जोशी यांना प्रेमाने पंत म्हटले जायचे. शिवसेनेसाठी ते आदर्श व्यक्तिमत्व होते असेही राऊत म्हणाले.
शून्यातून विश्व निर्माण करणारे..
कडवट महाराष्ट्र अभिमानी
अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले
मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/QV48ikmWv1— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2024