शेतकरी आत्महत्या कायमच्या थांबणार, महाराष्ट्रात विशेष टास्क फोर्सची योजना
या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना नवे बळ मिळणार आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष ‘टास्क फोर्स’ उभारण्यात आले आहे. (Farmer) कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. या कृती दलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासोबतच सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांवर एकत्रित उपाययोजना राबविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अशा प्रकारचे कृती दल स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.
या कृती दलाचं नेतृत्व, विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी करणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन बुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यजित शितोळे आणि सोनाली शिळकर या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या दलात केवळ प्रशासकीय अधिकारीच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या तज्ज्ञांनाही स्थान देण्यात आले आहे.
‘शिवार फाऊंडेशन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर संशोधन करणारे कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर अभ्यास करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ सृष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या कृती दलाच्या कामात मानवी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे केवळ कागदी योजनांपुरते न पाहता प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन उपाययोजना करण्याचा उद्देश आहे.
शेतकरी कर्जमाफी समितीचा विस्तार; नव्या 4 सदस्यांचा समावेश, सदस्य कोण अन् काम काय?
राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजना, उपक्रम आणि कार्यक्रम सातत्याने राबवले जात आहेत. तरीही हवामान बदलामुळे वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, आर्थिक ताणतणाव, सामाजिक दबाव आणि मानसिक अस्थैर्य यामुळे शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत. या सर्व घटकांचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि मानसिक आधार देणे आवश्यक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
या टास्क फोर्सच्या माध्यमातून आपत्तीपूर्व, आपत्तीच्या काळात आणि आपत्तीनंतर शेतकऱ्यांना शेती, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा चतुःसूत्री दृष्टिकोनातून मदत केली जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांच्या अडचणींकडे एकात्मिक पद्धतीने पाहून त्यावर ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शाश्वत आणि प्रभावी मॉडेल उभे करता येणार आहे.
कृषी आयुक्त मांढरे यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्या हा विषय केवळ आत्महत्येनंतर नुकसानभरपाई देण्यापुरता मर्यादित नाही. शेतकऱ्याला आधीपासून सक्षम बनवणे, त्याच्या उत्पन्नात वाढ करणे आणि मानसिक स्थैर्य देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. कृषी विभागातील विविध योजना आणि उपक्रम यांची सांगड इतर विभागांशी घालून अधिक प्रभावी पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना नवे बळ मिळणार आहे. मानसिक आरोग्य, सामाजिक परिस्थिती, आर्थिक स्थैर्य आणि हवामान बदल यांचा एकत्रित विचार करून शेतकऱ्यांसाठी ठोस आणि परिणामकारक पावले उचलली जाणार आहेत. राज्यात शेतकऱ्यांसाठी उभ्या राहत असलेल्या या नव्या यंत्रणेचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
