मान्सूनची पुन्हा जोरदार एंट्री; मुंबईसह कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज

येत्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होऊ शकतो.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design (27)

Forecast of increasing rainfall intensity : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आता मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 24 तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होऊ शकतो. विशेषतः 13 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने 8 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या पुढील पाच दिवसांच्या अंदाजानुसार उत्तर कोकण तसेच दक्षिण कोकण-गोवा परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडू शकतो. 9 ते 12 ऑगस्टदरम्यानही कोकण किनारपट्टीवर पावसाची शक्यता कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळू शकतात. तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या इम्पॅक्ट-बेस्ड फोरकास्टनुसार जोरदार पावसाच्या परिस्थितीत सखल भागांमध्ये पाणी साचणे, स्थानिक स्वरूपाचे पूर येणे, जुन्या किंवा कमकुवत इमारती व संरचनांचे नुकसान होणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय घाटमाथा आणि डोंगराळ भागांमध्ये भूस्खलन तसेच दरडी कोसळण्याचा धोकाही वाढू शकतो.

मुंबईच्या युवा फलंदाजासाठी भारतीय संघाची दारे पुन्हा खुली; 15 ऑगस्टपासून श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेला सुरुवात

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर यंदा पाऊस कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आतापर्यंतच्या पावसाळ्यात महाराष्ट्रात 637.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत राज्याची सरासरी 622.7 मिमी असून यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा दोन टक्के अधिक आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, तळकोकणात पावसाची संततधार कायम असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांमध्ये सलग पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1608 मिमी पावसाची नोंद झाली असली तरी ती गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 30 टक्के कमी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भात लागवडीची कामे पूर्ण केली असून तिलारी धरण 83.12 टक्के भरले आहे. धरणातून तिलारी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील 15 लहान-मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. या धरणांच्या सांडव्यांवरून पाणी वाहत असून जिल्ह्यातील एकूण धरणसाठा 81 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याने विशेषतः कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

follow us