Shocking revelations in Nashik conversion case : नाशिकमधील इंटरनॅशनल कंपनीतील तरुणीवर अत्याचार, मानसिक चाल आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या गंभीर प्रकरणात अटक करण्यात आलेली. संशयित निदा खान हिची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू असून, तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणाने नाशिकसह राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. पीडित तरुणीवर धार्मिक प्रभाव टाकून तिचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय अधिक गडद होत चालला आहे.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 26 मार्चपासून फरार असलेल्या निदा खानचा जामीन अर्ज 2 मे रोजी नाशिकरोड न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथून तिला ताब्यात घेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड घेत तिला नाशिकमध्ये आणले. शुक्रवारी तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 11 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज सोमवारी तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, तपासाची दिशा आणि नव्याने समोर आलेले मुद्दे लक्षात घेता तिच्या कोठडीत वाढ होण्याची शकयता व्यक्त केली जात आहे.
एसआयटीच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, निदा खानने पीडितेच्या घरी जाऊन स्वतःच्या धर्मशी संबंधित विधी आणि प्रार्थना केल्याचे निष्पन्न होत आहे. एवढेच नव्हे तर पीडितेला देखील त्या पद्धतीने वर्तन करण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. तिने पीडितेला धार्मिक विषयांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स पाठवल्या असल्याचे देखील तपासात उघड झाले आहे. या लिंक्सद्वारे धार्मिक प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का, याचा तपास देखील सुरू आहे.
तपासात आणखी एक महत्वाची बाब समोर आली आहे. पीडितेच्या मूळ नाव बदलून हानिया असे ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास यंत्रणेनुसार, हा केवळ नाव बदलण्याचा प्रकार नसून त्यामागे धार्मिक आणि मानसिक प्रभाव निर्माण करण्याचा सुनियोजित प्रयत्न असू शकतो. याच अनुषंगाने पीडितेला विशिष्ट प्रकारचा पोशाख परिधान करण्यास सांगणे, धार्मिक शिक्षण देणे आणि तिच्या दैनंदिन जीवनशैलीत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचे देखील तपासात समोर आले आहे.
इंधन जपून वापरा; पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशभरात चिंता, पेट्रोल-डिझेल 25 रुपयांपर्यंत महागण्याची शक्यता
या प्रकरणातील इतर संशयित डॅनिश शेख आणि तौसिफ़ अत्तर यांना देखील एसआयटी ताब्यात घेण्याच्या तयारीत असून, तिघांची एकत्रित चौकशी होणार आहे. या चौकशीतून संपूर्ण कटाची व्याप्ती आणि त्यामागील हेतू स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निदा खान अटकेसंदर्भात देखील काह्ही महत्वाचे तपशील समोर आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ती ज्या फ्लॅटमध्ये लपून राहत होती, तो फ्लॅट संशयित मतीन पटेल याने उपलब्ध करून दिल्याचे तपासात समोर आले आहे. सुरूवातीला हा फ्लॅट तिच्या मावशीचा असल्याची चर्चा होती, मात्र पोलिसांनी तो दावा फेटाळला असून तिच्या मावशीचा त्या फ्लॅटशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. निदा गर्भवती असल्यामुळे तिच्यासोबत तिची आई, वडील आणि मावशी संभाजीनगरमध्ये उपस्थित होते, अशी माहिती देखील समोर आली आहे.
याशिवाय, निदा खानचा काही राजकीय व्यक्तींशी संपर्क होता का, तिला आर्थिक मदत कोणी केली, ती एमआयएमच्या नागरसेवकांपर्यंत कशी पोहोचली, याचा देखील तपास एसआयटी करत आहे. या संपूर्ण प्रकरणामागे संघटित नेटवर्क कार्यरत होते का, याबाबत देखील तपास यंत्रणा विविध अंगांनी चौकशी करत आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात देखील कट रचून एका तरुणाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी डॅनिश, तौसिफ़, शाहरुख शेख, रजा मेमन आणि निदा खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निदाविरोधात आतापर्यंत दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद झाली असून, धर्मांतराचा प्रयत्न आणि कट रचल्याचा संशयावरून विविध कलमांची वाढ करण्यात आली आहे. इंटरनॅशनल कंपनीतील पीडितेवर अत्याचार, विनयभंग, मानसिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांशी संबंधित नाशिकमध्ये एकूण नऊ गुन्हे नोंद झाल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. या प्रकरणाचा तपास आता अत्यंत संवेदनशील टप्प्यावर पोहोचला असून, एसआयटी पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
