राज्यात नवीन सरकार आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सरकारवर जाहिरातीच्या खर्चावरून टीका होत असतानाच आता या सरकारच्या नव्या उधळपट्टीची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मागितलेल्या माहितीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नितीन यादव यांनी माहिती अधिकारात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा आजपर्यंतचा विमान प्रवास, निवास खर्च चहापान खर्च याची माहिती मागवली होती. त्यावर सामान्य प्रशासन विभागाने माहिती दिली आहे.
सामान्य प्रशासन विभागाने सह्याद्री अतिथीगृह, वर्षा बंगला आणि मुख्यमंत्री कार्यालयातील चहापान आणि खाण्याच्या खर्चाची माहिती दिली आहे.
यामध्ये सह्याद्री अथितीगृहावर ९ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट या काळात ९१ हजार ५०० रुपये खर्च केला गेला आहे.
तर मुख्यमंत्री कार्यलयात २२ जुलै ते ३० सप्टेंबर २०२२ या काळात ३ लाख ४९ हजार ९२९ रुपयांचा खर्च झाला आहे.
पण या सगळ्यात वर्षा निवासस्थानी मात्र कोट्यवधी रुपयांचा खर्च केला गेला आहे. १ जुलै ते ३१ ऑकटोबर या कालावधीमध्ये वर्षा निवासस्थानी अर्थात मुख्यमंत्री यांच्या अधिकृत बंगल्यात अतिथी यांच्यासाठी केलेल्या खानपानावर तब्बल २ कोटी ३८ लाख ३४ हजार ९५८ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
ही माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात हे सामान्य लोकांचं सरकार असल्याचा उल्लेख करत असतात पण त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या घरच्या जेवणावळीवर करोडो रुपयांचा खर्च केला जात आहे.
दरम्यान काही दिवसापूर्वी या सरकारने फक्त सात महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती समोर आली होती. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.
या धक्कादायक माहिती अशी की, या खर्चाची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास १९ लाख ७४ हजार रुपये जनतेच्या खिशातला शासकीय पैशाची उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे सर्वसामन्याच्या खिशातून शासनास जाणाऱ्या या पैशांच्या खर्चावर शासन आतातरी अंकुश लावेल का? असा प्रश्न सामाजीक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. यावर राजकीय वर्तुळातूनही टीका होत आहे.