पुणे : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक सहअध्यक्ष श्याम मानव यांच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मानव यांचा मुलगा हिंजवडी परिसरात असताना हा धमकीचा मेसेज आल्याने भारतीय दंड विधान संहिता आणि आयटी कायद्या अंतर्गत सूर्यप्रताप नावाच्या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांच्या दाव्यांना श्याम मानव यांनी आव्हान दिले आहे. तेव्हापासून त्यांना धमक्या येत आहेत. सध्या मानव यांना असलेल्या “वाय” दर्जाच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली आहे.
बागेश्वर बाबा नावाने प्रसिद्ध असलेले मध्य प्रदेश येथील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे धिरेंद्र कृष्णा शास्त्री महाराज हे अलीकडील काही काळात चर्चेत आले आहेत. लोकांच्या मनातील प्रश्न वाचण्याचा दावा ते करतात. नेमक्या त्यांच्या या दाव्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांनी आव्हान दिले आहे. तेव्हापासून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. आता तर त्यांचा मुलगा हिंजवडी परिसरात असताना घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी देण्यात आल्याने हा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.