नरेंद्र दाभोळकरांना मीच कार्याध्यक्ष केलं, पण दोन वर्षांतच संघटना फोडली; श्याम मानवांचा खळबळजनक दावा

‘लेट्सअप सभा’ या कार्यक्रमात बोलताना श्याम मानव यांनी संघटनेच्या स्थापनेपासून ते विभाजनापर्यंतचा प्रवास उलगडला.

Untitled Design 82 1

Untitled Design 82 1

Shyam Manav’s sensational claim : अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे संस्थापक श्याम मानव यांनी एका मुलाखतीत दिवंगत कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकर यांच्याविषयी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीतील अंतर्गत घडामोडींविषयी केलेल्या विधानांमुळे मोठी चर्चा रंगली आहे. ‘लेट्सअप सभा’ या कार्यक्रमात बोलताना श्याम मानव यांनी संघटनेच्या स्थापनेपासून ते विभाजनापर्यंतचा प्रवास उलगडला, तसेच आपल्या ‘मानव’ या आडनावामागची कहाणीही सांगितली.

श्याम मानव म्हणाले की, आपणच नरेंद्र दाभोळकर यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कार्याध्यक्षपदासाठी पुढे आणलं होतं. 1987 मध्ये बाबा आढाव यांच्या सूचनेनुसार मी नरेंद्र दाभोळकर यांना समितीत आणलं. कार्यकारिणीसमोर त्यांचं नाव मांडलं तेव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, त्यांच्या कामाची माहिती देत मी त्यांना संधी दिली. पुढची दोन वर्षे त्यांनी आमच्यासोबत काम केलं. पण 1989 मध्ये त्यांनी संघटना फोडली, त्यानंतर मी बाबांना सांगितलं की हे तुमचं पाप आहे. तुम्हीच त्यांना मला सुचवलं होत, असा आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी काही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांची नावं घेत त्या काळातील घडामोडींवरही भाष्य केलं. लक्ष्मण माने आणि पार्थ पोळके यांनी मला आधीच सावध केलं होतं. त्यांनीही आमचं संघटन फोडलं होतं, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मेधा पाटकर आणि अनिल अवचट यांनी मला बोलावून काही तरी निर्णय घेण्यास सांगितलं, असा दावा श्याम मानव यांनी केला.

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना किती वर्षांची शिक्षा? श्याम मानव स्पष्टच म्हणाले

दाभोळकरांना आपण स्वतंत्र चळवळ उभी करण्याचा सल्ला दिला होता, मात्र ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ हे नाव वापरू नये, अशी विनंतीही केल्याचं त्यांनी सांगितलं. मी दाभोळकरांना तेव्हा बोललो कि तुमची काम करण्याची जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही ठिकठिकाणी मार खाल त्याचा परिणाम माझ्या कार्यकर्त्यांना भोगावा लागेल. त्यामुळे छात्रभारती किंवा लोकविज्ञान संस्थेच्या माध्यमातून काम करा, असं मी त्यांना सुचवलं होतं, असंही ते म्हणाले.

श्याम मानव यांनी पुढे सांगितलं की, “महाराष्ट्रातील जवळपास 25 ते 26 जिल्ह्यांमध्ये समितीच्या कमिट्या उभ्या करण्याचं काम मी केलं होतं. मात्र, त्या कामाचं श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे मी स्वतःहून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. मी कोणत्याही कार्यकर्त्याला माझ्यासोबत या असं सांगितलं नाही. ज्यांना माझे विचार पटले ते माझ्यासोबत राहिले, तर काही जण दाभोलकरांसोबत गेले.

दरम्यान, श्याम मानव यांनी आपल्या ‘मानव’ या आडनावामागचं कारणही उलगडलं. त्यांनी सांगितलं की, 1970 साली जयप्रकाश नारायण यांच्या तरुण शांती सेनेत काम करत असताना जातीव्यवस्थेचा प्रभाव जवळून अनुभवायला मिळाला. “कोल्हापूरमधील एका शिबिरात देणग्या मोठ्या प्रमाणात मिळाल्या. त्यावेळी एका सहकाऱ्याने मला सांगितलं की, हे आपल्या आडनावाचा परिणाम आहे. त्यानंतर आम्ही जातीसूचक आडनावं सोडण्याचा निर्णय घेतला आणि मी ‘मानव’ हे आडनाव स्वीकारलं,” असा खुलासा त्यांनी केला.

Exit mobile version