रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत किताब गटातील गादी आणि माती विभागाच्या उपांत्यपूर्व तसेच उपांत्य फेरीच्या लढतींनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. (Kusti) कुठे एकतर्फी विजय, कुठे चुरशीची झुंज, तर कुठे शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला थरार अशा विविध रंगांनी नटलेल्या या लढतींमधून अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले. गादी विभागातून सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर, तर माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांनी अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
गादी विभागातील उपांत्यपूर्व फेरीत अकोल्याचा सिद्धांत गवई आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत अपेक्षित होती. मात्र सिद्धांत गवई गैरहजर राहिल्याने पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित करण्यात आले. साताऱ्याच्या दिग्विजय जाधवविरुद्ध सोलापूर शहराच्या जय पाटीलने 10-0 अशा दणदणीत फरकाने विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवला. स्पर्धेतील पहिल्या तीन फेऱ्यांपासून सातत्याने आक्रमक आणि प्रभावी कामगिरी करणाऱ्या जय पाटीलने या विजयासह प्रेक्षकांची दाद मिळवली.
नांदेडच्या शिवराज राक्षे आणि कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांच्यातील लढत विशेष रंजक ठरली. महाराष्ट्राला यापूर्वी अनेक पदके मिळवून देणारे हे दोन्ही अनुभवी मल्ल आमनेसामने आल्याने सामन्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. सुरुवातीपासूनच दोघांनी जोरदार डावपेचांची देवाणघेवाण केली. पहिल्या फेरीत पृथ्वीराज पाटीलने 10-4 अशी आघाडी घेतली. शेवटपर्यंत सामना रंगतदार झाला आणि अखेरीस पृथ्वीराज पाटीलने 10-6 अशा फरकाने विजय संपादन केला. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर आणि सोलापूरच्या अक्षय मंगवडे यांच्यातही तुल्यबळ झुंज पाहायला मिळाली. हर्षवर्धनने भारंदाज डावावर गुण कमावत विजय नोंदवला.
महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख, राक्षे, मोहोळची आगेकूच; ज्ञानेश्वर जमदाडेला धक्का
गादी विभागातील उपांत्य फेरीत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरचा जय पाटील यांच्यात रंगलेला सामना प्रेक्षकांसाठी खास ठरला. मात्र हा थरार फार काळ टिकला नाही. सामन्याच्या पहिल्याच मिनिटात जय पाटीलने पृथ्वीराज मोहोळला चितपट करत दणक्यात अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत झाली. पहिल्या फेरीत हर्षवर्धनला स्टेप आऊटवर 1 गुण मिळाला. दुसऱ्या फेरीत त्याने अधिक आक्रमक खेळ करत आणखी 2 गुण कमावले. पृथ्वीराजनेही 2 गुणांची कमाई केली. मात्र अखेरीस हर्षवर्धन सदगीरने 6-2 अशा फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.
माती विभागातील उपांत्यपूर्व फेरीत सोलापूर शहराच्या रविराज चव्हाणने कोल्हापूरच्या शुभम शिंदनाळेविरुद्ध 5-2 अशी सरशी साधली. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने सांगलीच्या इम्रान मुजावरवर 10-0 अशी एकतर्फी मात केली. हिंगोलीच्या सिकंदर शेखने गडचिरोलीच्या विक्रमसिंग भोसलेला 12-2 अशा तांत्रिक गुणाधिक्याने पराभूत केले. तर अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरने भंडाऱ्याच्या रामचंद्र कांबळेविरुद्ध 6-3 असा विजय मिळवत पुढील फेरी गाठली.
माती विभागातील उपांत्य फेरीत सोलापूर शहराचा ‘चपळ चित्ता’ रविराज चव्हाण आणि सोलापूरचा ‘बाहुबली’ महेंद्र गायकवाड यांच्यातील सामना विशेष गाजला. महेंद्रने सुरुवातीलाच भारंदाज डावावर 2 गुण घेत खाते उघडले. त्यानंतर पकडीवर आणखी 2 गुण मिळवत त्याने वर्चस्व प्रस्थापित केले. भारंदाज आणि पकड या प्रभावी डावांच्या जोरावर महेंद्र गायकवाडने 10-0 असा एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात हिंगोलीचा सिकंदर शेख आणि अहिल्यानगरचा सुदर्शन कोतकर यांच्यात जबरदस्त चुरस पाहायला मिळाली. सुदर्शनने सुरुवातीलाच ताबा मिळवत 3 गुणांची आघाडी घेतली आणि पहिल्या फेरीत वर्चस्व राखले. मात्र पुढे गुण न घेतल्याने सिकंदरला 1 गुण बहाल करण्यात आला. त्यानंतर सिकंदरने आक्रमक खेळ करत पकडीवर 2 गुण मिळवले आणि सामना 3-3 असा बरोबरीत आणला. निर्णायक क्षणी सिकंदरने स्टेप आऊटचा 1 मौल्यवान गुण घेत 4-3 असा थरारक विजय नोंदवला आणि अंतिम फेरीतील स्थान पक्के केले.
स्पर्धेला राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, पोलीस उपाधीक्षक राहुल आवारे, तसेच तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब विजेते विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी मल्लांना शुभेच्छा देत स्पर्धेच्या नेटके आणि भव्य आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.
