मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांकडून महापुरुष, संत, देवी देवतांबद्दल वादग्रस्त विधानं करण्यात येत आहेत. या पार्श्वभूीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्रकाद्वारे पक्षातील कार्यकर्त्यांना समज नाहीतर ताकीद दिलीय.
ठाकरे यांनी पत्रात म्हंटले, “सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स याच्याने हे सगळे शेफारले आहेत.
इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही. माझ्या पक्षातल्या कोणालाही, पक्षांतर्गत बाबींवर काही म्हणणं मांडायचं असेल तर संबंधित नेत्यांशी बोला.
माझ्याशी बोला, पण हे सोडून जर थेट माध्यमांशी बोलायचं असेल किंवा सोशल मीडियावर जाऊन गरळ ओकायची असेल, तर आधी राजीनामा द्या, मग काय घाण करायची आहे ती करा, पक्षात राहून असे प्रकार केले, तर हकालपट्टी अटळ आहे हे लक्षात ठेवा. ही समज नाही तर अंतिम ताकीद आहे ह्याची नोंद घ्या”
या शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना ताकीद दिली आहे. यासंदर्भातील पत्रकच काढून त्यांनी पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, भाजपसह शिवसेनेच्या काही नेत्यांकडून महापुरुष, संत, देवी देवतांबद्दल वादग्रस्ते विधाने करण्यात आले होते. यामध्ये विशेषत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार प्रसाद लाड यांच्याकडून वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलनेही करण्यात आली.