Ashok Chavan : महायुतीला राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाप्रचंड यश मिळालं. या निवडणुकीत महायुतीला २३० हून अधिक जागा मिळाल्या. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. (Ashok Chavan) दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया या देखील भोकर या मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. ही निवडणूक सोपी नव्हती असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
मी जेव्हा निवडणूक लढवली होती तेव्हा समीकरणं वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा लोकांचा भर कामांवर होता. मी मतदारसंघात प्रचंड काम केलं आहे. पण फक्त काम चालतं असं नाही. सोशल मीडियावर होणारा प्रचार, तिथे आपल्याबद्दल चालणारा अपप्रचार या सगळ्या गोष्टी तरुण वर्ग लक्षात घेतो. तरुण वर्गाच्या आता वेगळ्या अपेक्षा असतात असं चव्हाण म्हणाले आहेत.
त्याचबरोबर श्रीजया जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात होती तेव्हा मी हे देखील पाहिलं की ज्या मंडळींना मीच मोठं केलं, तेच या निवडणुकीत माझ्या विरोधात उभे होते मला विरोधक नवखा नव्हता. मी पहिली निवडणूक लढलो त्यावेळी विरोधक विरोधी पक्षातले होते. या निवडणुकीत आपणच मोठे केलेले विरोधक होते असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले आहेत. तसंच रेवंथ रेड्डींचं नाव घेत त्यांनी आपल्याला घेरण्याची पूर्ण तयारी काँग्रेसने केली होती असा आरोपही त्यांनी केली होती.
माझ्या नेतृत्वात 82 जागा निवडून आल्या अन् पटोलेंनी 82 च्या 16 केल्या; चव्हाणांचा टोला
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याकडे फक्त भोकर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचे दोन मंत्री मतदारसंघात तळ ठोकून होते. प्रचंड पैसा वापरला गेला. मला घेरण्याची पूर्ण तयारी काँग्रेसने केली होती. त्यामुळे श्रीजयासाठीच्या ज्या निवडणुकीला आम्ही सामोरे गेलो ती सोपी नक्कीच नव्हती. मला कल्पना होती की काँग्रेसकडून कसा अटॅक होऊ शकतो. कारण मी इतकी वर्षे काँग्रेसमध्ये काढली आहेत असंही ते यावेळी म्हणाले.
निर्णय अचूक
मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला तो अचूक आहे हे मला माहीत होतं. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही चांगले लोक भाजपातून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. लोकांना वाटलं की सामाजिक समीकरण असंच राहिल. मात्र, मी अनुभवाने सांगतो की लोकसभा आणि विधानसभा यामध्ये महाराष्ट्राने नेहमी फरक केलेला आहे. आत्ताही तसंच घडलं. लोकसभेला या मतदारसंघात कमी लीड होता. सध्याच्या घडीचा लीड पाहिला तर ३९ हजारांचा लीड होता. ही परिस्थिती तीन महिन्यांतच बदलली असं अशोक चव्हाण म्हणाले