State government takes major action against illegal passenger traffic : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नाला फटका देणाऱ्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्य सरकारने आता कडक पावले उचलली आहेत. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात सुरू असलेल्या अवैध खासगी प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी 5 जून ते 15 जून 2026 या कालावधीत राज्यव्यापी विशेष अंमलबजावणी मोहीम राबवण्यात येत आहे.
परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या मोहिमेचे आदेश दिले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अवैध वाहतुकीसंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.
संयुक्त पथकांची नियुक्ती
या विशेष मोहिमेसाठी एसटी महामंडळाने विभागीय वाहतूक अधिकारी, प्रादेशिक व्यवस्थापक, आगार व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक तसेच सुरक्षा आणि दक्षता विभागातील अधिकारी व पर्यवेक्षक यांची संयुक्त पथके नियुक्त केली आहेत. या पथकांना प्रत्यक्ष मैदानात उतरून तपासण्या करण्याचे तसेच प्रत्येक कारवाईचा सविस्तर अनुपालन अहवाल मुख्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
स्वयंपाकघराला महागाईची झळ; घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर 29 रुपयांनी महाग, आजपासून नवे दर लागू
बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर शून्य सहनशीलता
एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडी, अनधिकृत प्रवासी वाहतूक आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. याबाबत बोलताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. एसटीच्या उत्पन्नावर डल्ला मारणारी आणि प्रवाशांच्या सुरक्षेशी खेळ करणारी अवैध वाहतूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. बसस्थानक परिसरातील गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”
प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
अवैध खासगी वाहतुकीमुळे बसस्थानक परिसरात वाढणारी गुन्हेगारी, महिला प्रवाशांची छेडछाड, एजंटांची दादागिरी आणि प्रवाशांची होणारी फसवणूक रोखणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. प्रवाशांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, 15 जूनपर्यंत सुरू राहणाऱ्या या विशेष मोहिमेकडे एसटी प्रशासनासह प्रवासी संघटनांचेही लक्ष लागले आहे.
