सिंहगड संस्थेतील संपावर अखेर पडदा, कोंढवा-नऱ्हे कॅम्पसमधील कर्मचारी कामावर रुजू

संस्थेच्या तोंडी विनंतीला प्रतिसाद देत 21 नोव्हेंबपासून संप मागे घेत असल्याचे पुणे जिल्हा मजदूर संघाने दोन स्वतंत्र पत्रांद्वारे स्पष्ट केल.

Untitled Design   2026 11 22T133059.458

Untitled Design 2026 11 22T133059.458

Strike by employees at Sinhagad institution called off : पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कोंढवा आणि नऱ्हे कॅम्पसमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाच्या प्रश्नावर महत्वाची घडामोड समोर आली आहे. पुणे जिल्हा मजदूर संघाच्या माध्यमातून संपाबाबत देण्यात आलेल्या नोटीसीनंतर अखेर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या व्यवास्थापनाकडून करण्यात आलेल्या तोंडी विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत 21 नोव्हेंबर 2026 पासून संप मागे घेत असल्याचे पुणे जिल्हा मजदूर संघाने दोन स्वतंत्र पत्रांद्वारे स्पष्ट केले आहे.

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या कोंढवा कॅम्पसमध्ये काम करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने ३० जुलै २०२६ पासून बेमुदत संपावर जाण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. तर नऱ्हे कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांच्या वतीने 19 ऑगस्ट 2026 पासून बेमुदत संपाची नोटीस देण्यात आली होती. या दोन्ही कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात पुणे जिल्हा मजदूर संघाने संस्थेच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला होता.

दरम्यान, या संपाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना तोंडी विनंती करण्यात आली होती. व्यवस्थापनाच्या या विनंतीचा मान राखून कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने आपल्या पत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे, कोंढवा आणि नऱ्हे या दोन्ही कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वतंत्र पत्रे देऊन संप मागे घेतल्याची अधिकृत माहिती व्यवस्थापनाला कळवण्यात आली आहे.

भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चौघांना संधी; नितीन नबीन यांची घोषणा!

पुणे जिल्हा मजदूर संघाचे सरचिटणीस बाळासाहेब भुजबळ यांच्या स्वाक्षरीने ही पत्रे 29 सप्टेंबर 2026 रोजी देण्यात आल्याचे पत्रावरील नोंदीतून दिसून येते. या पत्रांमध्ये 21 नोव्हेंबर 2026 पासून सर्व कर्मचारी संप मागे घेत असून, आपल्या नेहमीच्या वेळेत कामावर रुजू होत असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या पत्रांच्या प्रती संबंधित कोंढवा आणि नऱ्हे पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पुणे उपकामगार आयुक्त तसेच सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या संबंधित प्रशासकीय आणि शैक्षणिक विभागांनाही पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याची माहिती संबंधित यंत्रणांपर्यंतही पोहोचवण्यात आली आहे.

एकीकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेला तणाव आणि दुसरीकडे संस्थेच्या व्यवस्थापनाकडून करण्यात आलेली विनंती, या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. आता कोंढवा आणि नऱ्हे कॅम्पसमधील कर्मचारी आपल्या नियमित वेळेत कामावर रुजू होणार असल्याने संस्थेतील कामकाज पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बारामतीत गोळीबार; इन्स्टाग्रामवरून मागितली 2 लाखांची खंडणी, नेमकं प्रकरण काय?

मात्र, या संपूर्ण प्रकरणात कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या, व्यवस्थापनाकडून त्यावर कोणती भूमिका घेण्यात आली आणि भविष्यात या प्रश्नांवर काही ठोस निर्णय होणार का, याबाबत दोन्ही पत्रांमध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना यांच्यात पुढील काळात काय चर्चा होते, याकडे आता लक्ष लागले आहे.

सध्या तरी पुणे जिल्हा मजदूर संघाच्या पत्रानुसार सिंहगड संस्थेच्या कोंढवा आणि नऱ्हे कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांनी 21 नोव्हेंबरपासून संप मागे घेतला असून, नियमित वेळेत कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला आहे.

Exit mobile version