वैद्यकीय प्रवेशासाठी महत्त्वाची असलेल्या (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. आता परीक्षा आणि नोकरीच्या नावाखाली उमेदवारांची फसवणूक होत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. विमानतळावर आकर्षक नोकरी देण्याचे आमिष दाखवत एका खासगी कंपनीने महाराष्ट्रातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांकडून पैसे उकळल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
विमानतळावर नोकरी, दरमहा ₹25,000 पगार आणि शासकीय भरतीप्रमाणे पारदर्शक निवड प्रक्रिया असल्याचे भासवून विद्यार्थ्यांकडून अर्जाच्या नावाखाली ₹500 ते ₹700 शुल्क घेण्यात आल्याचा आरोप आहे. गेल्या महिनाभरापासून ऑनलाइन अर्ज भरून आणि परीक्षेची तयारी करून राज्यभरातील शेकडो विद्यार्थी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेसाठी दाखल झाले. मात्र, परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांना कथित फसवणुकीचा प्रकार लक्षात आला.
किती युवकांना कायमस्वरुपी नोकरी मिळते?, छात्रों की गुंज कार्यक्रमात राहुल गांधींकडून सरकारची चिरफाड
कंपनीकडून विद्यार्थ्यांची ऑनलाइन संगणकीय परीक्षा घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर एकही संगणक उपलब्ध नसल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत अधिक विचारणा केली असता, परीक्षा घेण्यासाठी आलेल्या कथित ‘थर्ड पार्टी’ कंपनीच्या प्रतिनिधींनीही आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्रावरच गोंधळ घालत आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला.
दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतली. हजारो विद्यार्थ्यांकडून शुल्क घेऊन त्यांना नोकरीचे आमिष दाखवण्यात आले का, कंपनीने प्रत्यक्षात परीक्षा आयोजित केली होती का आणि या संपूर्ण प्रक्रियेमागे नेमके कोण आहे, याबाबत आता चौकशीची मागणी होत आहे. या प्रकरणात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे तपासात स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
