Sudden raid by the Food and Drug Administration : राज्यभरात भेसळयुक्त आणि निकृष्ठ दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार विविध ठिकाणी तपासण्या आणि कारवाया करण्यात येत आहेत. या मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर अचानक छापा टाकण्यात आला. लाखो भाविकांचे आकर्षण असलेल्या शेगाव कचोरीच्या निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली गृवरी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. कचोरी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची तपासणी करून त्याचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांमध्ये भेसळ अथवा दर्जाबाबत अनियमितता आढळल्यास संबंधित कचोरी सेंटरवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबईतील मुलुंड परिसरातही अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. गुप्ता चणा भंडार या आस्थापनाची तपासणी करताना अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थ तयार व साठवले जात असल्याचे आढळून आले. तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या अनेक खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर उत्पादकाचे नाव, निर्मिती दिनांक किंवा मुदत संपण्याची तारीख यांसारखी आवश्यक माहिती नसल्याचे निदर्शनास आले.
मुख्यमंत्रीपदाची ऑफर, शरद पवारांप्रती निष्ठा आणि गमावलेली संधी; भुजबळांच्या वक्तव्यावर पटोलेंची प्रतिक्रिया
या गंभीर बाबींची दखल घेत प्रशासनाने एकूण 114.2 किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 8 हजार 290 रुपये आहे. जप्त करण्यात आलेल्या पदार्थांमध्ये पाणीपुरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, बारीक शेव, शेवपुरी साहित्य, भाजलेले चणे, मुरमुरे तसेच संशयास्पद रंगयुक्त हिरवे वाटाणे यांचा समावेश आहे. संबंधित व्यवसाय बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर औषध वितरण व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. इंडियन फार्मासिस्ट असोसिएशनने आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे निवेदन देत मेडिकल दुकानांमध्ये केवळ नोंदणीकृत फार्मासिस्टकडूनच औषध वितरण होण्याची कायदेशीर तरतूद काटेकोरपणे लागू करण्याची मागणी केली आहे. मेडिकल दुकान हे किराणा दुकान नसून औषध आणि आजाराविषयी योग्य ज्ञान असलेल्या प्रशिक्षित व्यक्तीकडूनच औषधांचे वितरण व्हावे, असे संघटनेचे म्हणणे आहे.
तसेच मेडिकल परवान्यांचे भाडेकरार, परवाना धारक प्रत्यक्ष उपस्थित नसणे आणि नियमांचे उल्लंघन अशा प्रकारांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. रुग्णांना योग्य मार्गदर्शन आणि सुरक्षित औषध वितरण सुनिश्चित करण्यासाठी नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती अनिवार्य करण्यात यावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या या सलग कारवायांमुळे राज्यभरातील अन्न व्यवसायिक आणि औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात प्रशासनाचा कठोर पवित्रा कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
