Sugarcane Agitation : ऊसाच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन सुरु आहे. उसाला पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी किणी टोलनाक्यावर सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाचा दुसरा दिवसही तोडग्याविनाच सुरू आहे. 30 तासांहून अधिक काळ उलटूनही प्रशासन किंवा साखर कारखानदारांकडून चर्चेसाठी पुढाकार घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी वाढत आहे. दरम्यान, आंदोलकांनी रात्र महामार्गावरच काढली. शिवसेना ठाकरे गटही आज आंदोलनात सहभागी झाल्याने आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये मिळाल्याशिवाय महामार्गावरून हटणार नाही, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे. अंथरूण-पांघरूण घेऊन हजारो शेतकऱ्यांनी टोलनाका परिसरातच रात्री मुक्काम केला. सकाळी पुन्हा घोषणाबाजी आणि भाषणांनी आंदोलनाला सुरुवात झाली. किणी टोलनाक्यावरील चक्काजाममुळे महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गांनी वळविण्यात आली होती. मात्र, आता या मार्गांवरील वाहतूकही रोखण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील बलवडी येथेही शेतकऱ्यांनी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात प्रवास करणारे व गावाकडे परतणारे नागरिक रस्त्यात अडकले असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. ऊसदराचा प्रश्न तातडीने सोडवून वाहतूक पूर्ववत करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
आंदोलनस्थळी मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांच्या भोजनासाठी परिसरातून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. सुमारे एक लाख पत्रावळ्या, डाळ-तांदळाची शेकडो पोती, तेलाचे डबे आणि भाजीपाला जमा झाला आहे. किणी, घुणकी, भादोलेसह परिसरातील गावांतून चपाती व भाकरी आणून दिल्या जात आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि उपनेते अरुणभाई दुधवडकर यांच्या सूचनेनुसार कोल्हापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, बाळासाहेब पाटील, रवी निंबाळकर, संदीप दबडे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक आंदोलनस्थळी उपस्थित होते.
