इथेनॉलमुळं साखर महाग झाली का?, सर्वसामान्यांच्या खर्चावर किती परिणाम?, सरकारने काय दिलं स्पष्टीकरण?

जगभरात सुमारे 33 लाख टन साखरेची तूट निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांवरही झाला आहे.

Thenol

साखर ही केवळ चहापुरती मर्यादित (Sugar) असलेली वस्तू नसून प्रत्येक घरातील दैनंदिन वापरातील महत्त्वाचा घटक आहे. चहा, कॉफी, दूध, शिरा, पोहे, मिठाई, घरगुती पदार्थ तसंच विविध खाद्यपदार्थांच्या निर्मितीत साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळं साखरेच्या दरात झालेली वाढ थेट सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील खर्चावर परिणाम करणारी ठरणार आहे. साखरेचे दर आणखी वाढल्यास घरगुती खर्चाबरोबरच मिठाई, बेकरी पदार्थ, शीतपेयांसह साखरेचा वापर असलेल्या अनेक खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची भीती आहे. त्यामुळं साखरेची दरवाढ ही केवळ एका वस्तूच्या किमतीपुरती मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चाचे गणित बिघडवू शकते.

महिनाभरात किलोमागे 7.52 रुपयांची वाढ

देशांतर्गत बाजारात साखरेच्या दरात गेल्या काही आठवड्यांत लक्षणीय वाढ झाली. 20 जुलै 2026 रोजी साखरेचा दर प्रतिकिलो 48.18 रुपये होता. त्यात वाढ होऊन 20 ऑगस्ट रोजी हा दर 55.70 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला. म्हणजेच अवघ्या महिनाभरात साखरेच्या दरात प्रतिकिलो 7.52 रुपयांची वाढ झाली आहे. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे साखरेच्या उपलब्धतेबाबत तसंच आगामी काळातील दरांबाबत चिंता वाढली आहे.

इथेनॉलमुळं साखर महागली नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण

साखरेच्या दरवाढीमागं इथेनॉल निर्मितीसाठी साखरेचा वापर कारणीभूत नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, इथेनॉल निर्मितीसाठी वळवण्यात येणाऱ्या साखरेचं प्रमाण 2022-23 मध्ये सुमारे 12 टक्के होतं. हे प्रमाण 2025-26 मध्ये घटून सुमारे 9 टक्क्यांवर आलं आहे. त्याचबरोबर देशात उत्पादित होणाऱ्या इथेनॉलपैकी सुमारे तीन चतुर्थांश इथेनॉल आता धान्यापासून, विशेषतः मक्यापासून तयार केलं जात आहे.

साखर उत्पादनावर रोगराई आणि पावसाचा परिणाम

यंदाच्या हंगामात देशातील साखर उत्पादन सुमारे 306 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. हंगामाच्या सुरुवातीला ऊस उत्पादक राज्यांनी सुमारे 343 लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र उसाच्या पिकाला रेड रॉट आणि टॉप बोरर या रोगांचा फटका बसला. त्याचबरोबर अतिवृष्टी आणि शेतांमध्ये साचलेल्या पाण्यामुळंही ऊस उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळं अपेक्षित उत्पादनाच्या तुलनेत प्रत्यक्ष उत्पादन कमी राहण्याची शक्यता आहे.

Pakistani Sugar : पाकिस्तानकडून साखर खरेदी? पाकिस्तानी कारखानदारांची सरकारकडे मोठी मागणी

जागतिक पातळीवरही साखरेच्या पुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. 2026-27 मध्ये जगभरात सुमारे 33 लाख टन साखरेची तूट निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांवरही झाला आहे. 30 जून रोजी साखरेचा आंतरराष्ट्रीय दर प्रतिटन 474 डॉलर होता. तो 20 ऑगस्ट रोजी वाढून 552 डॉलर प्रतिटन झाला. म्हणजेच सुमारे दोन महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेच्या दरात 16 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

देशांतर्गत बाजारात मात्र साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून, ऑक्टोबरमध्ये नवीन गाळप हंगाम सुरू होईपर्यंत देशातील मागणी पूर्ण करता येईल, असा सरकारचा दावा आहे. यंदाच्या उत्पादनातील घट लक्षात घेता उपलब्ध साठ्याचं योग्य व्यवस्थापन करणं आणि बाजारातील पुरवठा सुरळीत ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरवाढ रोखण्यासाठी सरकारचे निर्णय

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने व्यापाऱ्यांवर 400 टनांची साठा मर्यादा लागू केली आहे. ही मर्यादा 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत लागू राहणार आहे. तसंच 1 सप्टेंबरपासून मोठे खरेदीदार 15 दिवसांच्या वापरापेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवू शकणार नाहीत. साखर कारखान्यांमधील साठ्याची तपासणी करण्यासाठी सरकारी पथकांकडून पाहणीही केली जात आहे.

पुरवठा वाढवण्यासाठी शुल्कमुक्त आयात

देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने 10 लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. तसंच साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये साखर उत्पादन नेहमीच्या 3 ते 4 लाख टनांवरून 10 लाख टनांहून अधिक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, 20 ऑगस्ट 2026 पर्यंत 2025-26 हंगामातील 97 टक्के ऊस थकबाकी शेतकऱ्यांना अदा करण्यात आल्याचे सरकारने सांगितले आहे. ग्राहकांबरोबरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचाही विचार केला जात असल्याचं सरकारचं म्हणणे आहे.

follow us