Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या यादीत खासदार प्रफुल पटेल, खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांचे नाव दिसत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललं काय? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या यादीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अजित पवार गटाकडून राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत (NCP National Executive List) निवडणूक आयोगाला 29 एप्रिल रोजी दिलेला पत्र सोशल मीडियावर सध्या जोरात व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये खासदार पार्थ पवार (Parth Pawar) आणि जय पवार (Jay Pawar) यांचा जनरल सेक्रेटरी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल पटेल (Praful Patel) तसेच छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांची नावे राष्ट्रीय कार्यकारणीमधून गायब करण्यात आली आहे. मात्र आता यावर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी स्पष्टीकरण देत याला एक तांत्रिक चूक म्हटले आहे.
सुनेत्रा पवार एक्सवर पोस्ट करत म्हणाल्या की, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत एक तांत्रिक चूक असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
A list of office bearers of the NCP circulating in the media has a clerical mistake and will be corrected soon.
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) May 11, 2026
बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार
नुकतंच बारामती मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी बाजी मारली आहे. सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी निवडणून आल्या आहेत. तर दुसरीकडे 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार होणार असल्याचे संकेत जय पवार आणि रोहित पवार यांच्याकडून देण्यात आले आहे.
तर आता युगेंद्र पवार आणि जय पवार यांच्याकडून मतदारसंघात दौरे सुरु आहेत. दोन्ही नेते गाठीभेट घेत लोकांच्या समस्या सोडवण्यास भर देत असल्याने 2029 मध्ये पुन्हा बारामती विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार सामना होणार असल्याची चर्चा सध्या जोराने राजकीय वर्तुळात सुरु आहे.
