Sunetra Pawar takes an aggressive stance on the anniversary : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाची आगामी दिशा, संघटनात्मक धोरण आणि शिस्तीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. मंत्री, आमदार, खासदार आणि शेकडो पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना त्यांनी पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करत, गरज पडल्यास कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा दिला.
सुनेत्रा पवार म्हणाल्या की, संघटना मजबूत करण्यासाठी आजपासूनच कामाला लागावे लागेल. गाव, वाडी, वस्ती आणि प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी करण्याचे लक्ष्य ठेवावे लागेल. पक्षात ज्येष्ठांचा सन्मान कायम राखत नव्या पिढीला संधी दिली जाईल. ज्येष्ठांचा अनुभव आणि युवकांची ऊर्जा यांचा समन्वय साधून पक्षाची वाटचाल पुढे नेली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना परिस्थितीची पूर्ण जाणीव होती, असे सांगत त्यांनी, मी पक्षाला सर्वोच्च प्राधान्य देत दादांच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करत आहे. प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा मला माहिती आहे. योग्य वेळी प्रत्येकाला न्याय आणि संधी दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी त्यांनी पक्षातील काही घटकांना अप्रत्यक्ष इशारा देखील दिला. दादांनी त्यांच्या हयातीत सर्वांना समजून घेतले, सन्मान दिला, पदे दिली आणि सर्वांचे हट्ट पुरवले. मात्र यापुढे पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. पक्षाच्या हितासाठी दादा जसे कठोर निणय घेत होते, तसे निर्णय घेणे मला जड जाईल, पण न्यायासाठी गरज पडल्यास मीही ते निर्णय घेईन, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
आम्ही मृतदेहाचे लिंग..,; प्रणितच्या शोमध्ये महिला डॉक्टर बरळली, नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली!
पक्षाची प्रतिमा जपण्याबाबतही त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. पक्षाची बदनामी ही केवळ माझी नव्हे तर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. मला कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असा इशारा त्यांनी दिला. महामंडळे आणि विविध संस्थांमधील नियुक्त्यांबाबत बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, पक्षनिष्ठा, समर्पण, गुणवत्ता आणि पात्रता यांचा विचार करूनच संधी दिली जाईल. केवळ किती वर्षे काम केले यापेक्षा पक्षाला पुढे नेण्यासाठी दिलेल्या योगदानाला अधिक महत्त्व दिले जाईल.
पक्ष विस्तारासाठी बाहेरच्या नेत्यांना संधी द्यावी लागली तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान अबाधित ठेवला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. सुनेत्रा पवार यांच्या या भाषणानंतर त्यांच्या इशाऱ्याचा रोख नेमका कोणाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्षातील शिस्त, हस्तक्षेप आणि आगामी नियुक्त्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वक्तव्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
