21 वेळा तावडेंना भेटले म्हणजे युती होते का?… लाईव्ह शोमध्ये सुळेंचा फोन… महायुतीच्या चर्चांवर दिलं स्पष्टीकरण

Supriya Sule On Mahayuti Alliance संसदेतील संयुक्त संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे खासदार एकत्र येऊन देशहिताच्या धोरणांवर चर्चा करतात.

Supria Sule

Supria Sule

Supriya Sule Clarification On NCP- Mahayuti Alliance :  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. भाजप नेते विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेली भेट, त्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांमुळे वातावरण तापले असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीच्या लाईव्ह कार्यक्रमात थेट फोन करून आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमात त्यांचे नाव घेत, त्यांनी स्वतः विनोद तावडेंना 21 वेळा भेटल्याचा उल्लेख करण्यात आल्याने सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत या सर्व चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले.

केंद्रीय मंत्र्याच्या कार्यालयातील चार अधिकाऱ्यांना अचानक हटवले; PMO पर्यंत पोहोचले आदेश

माझं नाव घेण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासा

लाईव्ह चर्चेदरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मी 21 वेळा विनोद तावडेंना भेटले, असा उल्लेख करण्यात आला. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, त्यामुळे अशी माहिती देताना वस्तुस्थिती तपासणे अपेक्षित आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, या भेटी राजकीय वाटाघाटींसाठी नव्हत्या, तर संसदेतील संयुक्त संसदीय समित्यांच्या कामकाजाचा भाग होत्या.

देशहितासाठी सर्व पक्ष एकत्र काम करतात

सुळे म्हणाल्या की, संसदेतील संयुक्त संसदीय समित्यांमध्ये सर्व पक्षांचे खासदार एकत्र येऊन देशहिताच्या धोरणांवर चर्चा करतात. तेथे भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा विचार होत नाही. पॉलिसी मेकिंगमध्ये देशाचे हित हेच केंद्रस्थानी असते असे त्या म्हणाल्या.

संवाद म्हणजे युती नव्हे

भाजप नेत्यांशी चांगला संवाद असल्याचा उल्लेख होताच सुप्रिया सुळे यांनी त्यावरही स्पष्टीकरण दिले. मी सर्वांशी संवाद ठेवते. मी लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. विरोधकांशी संवाद असणे म्हणजे राजकीय नातं किंवा युती होत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी पुढे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा दाखला देत सांगितले की, चव्हाण साहेबांनी आम्हाला शिकवलं की, विरोधक हा शत्रू नसतो. सशक्त लोकशाहीत संवाद आवश्यक असतो.

ठाकरेंचे 15 आमदार अन् 25 नगरसेवक जाणार; थेट तारीख सांगत हिंदुस्तानी भाऊचा खळबळजनक दावा

‘ऑपरेशन सिंदूर’चाही दिला दाखला

देशहिताच्या मुद्द्यांवर सर्व पक्ष एकत्र येतात, हे सांगताना सुळे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख केला. भारतावर हल्ला झाल्यानंतर शरद पवार यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली होती. त्याचप्रमाणे काँग्रेसनेही राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला पाठिंबा दिल्याचे त्यांनी नमूद केले.

पक्षात अशी कोणतीही चर्चा नाही

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातील काही आमदार-खासदार सत्तेसोबत जाण्याच्या बाजूने असल्याची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता सुळे यांनी तीही फेटाळून लावली. माझ्या कानावर आजपर्यंत अशी कोणतीही चर्चा आलेली नाही. तुमचे जे ‘सोर्सेस’ आहेत, त्यांची एकदा पडताळणी करा. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात अशा प्रकारची चर्चा कालही नव्हती आणि आजही नाही, असे त्या ठामपणे म्हणाल्या.

शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत येणार का ? देवेंद्र फडणवीसांचे दिल्लीत मोठे विधान

राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न

विनोद तावडे-जयंत पाटील भेटीनंतर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष महायुतीत जाणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र, सुप्रिया सुळे यांनी सार्वजनिकरित्या भूमिका स्पष्ट करत, भाजप नेत्यांशी संवाद असणे आणि राजकीय युती होणे या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. आता या स्पष्टीकरणानंतर राज्याच्या राजकारणातील या चर्चांना कितपत विराम मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version