बाबा ऐकत नाहीत…शरद पवारांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करताच लेक सुप्रियांची पोस्ट

Sharad Pawar रुग्णालयात दाखल होताच खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीची बैठक सोडून तातडीने रूग्णालयात दाखल...

Sharad Pawar Health Update

Sharad Pawar Health Update

Sharad Pawar Health Update : ज्येष्ठ नेते शरद पवारांना रुटीन चेकअपसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पवारांना नेमका काय त्रास होतोय आणि आता त्यांची तब्येत कशी आहे याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये एक लेक म्हणून सुप्रिया यांनी वडील शरद पवार यांच्याबद्दल बाबा ऐकत नाहीत अशी प्रेमळ पण काळजी व्यक्त करणारी तक्रार केली आहे.

काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील रूबी हॉल आणि नंतर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. त्यावेळी देखील डॉक्टरांनी पवारांना प्रवास टाळण्यास आणि आराम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आराम पडताच पुन्हा शरद पवार सक्रिय झाले होते. मात्र, आज त्यांना थोडं बरं वाटत नसल्याने आणि रुटीन चेकअपसाठी ब्रीच कँडीत आले असता त्यांची प्रकृती तपासल्यानंतर डॉक्टरांनी पवारांना अ‍ॅडमिट करून घेतलं आहे.

सुप्रिया सुळे यांची पोस्ट काय?

शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या तब्येतीबाबत सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे. ज्यात त्यांनी डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने बाबांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा तसेच विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण बाबा ऐकत नाहीत. त्यांना कामात रमून जायला आवडते. बाबांची तब्येत ठीक असून, आपण सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल मनापासून आभार.

”साहेबांच्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करू नये”

आदरणीय पवार साहेब यांना डिहायड्रेशनच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुप्रियाताई सध्या प्रत्यक्ष साहेबांना भेटून पुन्हा बैठकीसाठी येत आहेत. सध्या साहेबांची प्रकृती स्थिर आणि व्यवस्थित असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील दोन दिवस त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू राहतील. त्यामुळं साहेबांच्या तब्येतीबाबत कुणीही काळजी करू नये! धन्यवाद ..!

 

Exit mobile version