नात्यात सुप्रिया सुळेंचे व्याही, पण मैदानात भाजपचे शिलेदार; अरुण लखानी यांना उमेदवारी का मिळाली?
गडकरी-फडणवीस या दोन्ही बड्या नेत्यांचे खंदे समर्थक असलेल्या अरुण लखानी यांच्या उमेदवारीने विदर्भाच्या राजकीय गणितांना नवा आयाम दिला आहे.
Vidhan Parishad Election Know Who Is Arun Lakhani : नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही बड्या नेत्यांचे खंदे समर्थक असलेल्या अरुण लखानी यांच्या उमेदवारीने विदर्भाच्या राजकीय गणितांना नवा आयाम दिला आहे. त्यातच, लखानी हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आणि त्यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे आहेत, त्यामुळे या निवडणुकीला एक वेगळाच रंग चढला आहे. एकीकडे पवार कुटुंबाशी असलेले कौटुंबिक नाते आणि दुसरीकडे भाजपची निष्ठावंत उमेदवारी, अशा दुहेरी पेचात ही निवडणूक रंगणार असून, लखानी यांचा उद्योगपती ते राजकारणी कारकीर्द नेमकी कशी? आणि लखानी यांना विधानपरिषदेच्या मैदानात उतरवण्यामागे भाजपची कोणती मोठी रणनीती आहे याबद्दल जाणून घेऊया..
अरुण लखानी यांची बहुआयामी कारकीर्द कशी?
अरुण लखानी हे केवळ एक राजकीय नाव नसून विदर्भातील आणि महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित उद्योगपती म्हणून त्यांची ओळख आहे. लखानी हे ‘त्रिशूल इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ‘व्हिल्सन ग्रुप’ (VILSON Group) सारख्या मोठ्या उद्योग समूहांचे नेतृत्व करतात. पायाभूत सुविधा, जलव्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांमध्ये त्यांच्या कंपन्यांनी मोठे नाव कमावले आहे. नागपूरच्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
क्रीडा क्षेत्रातही मोठं योगदान
उद्योग जगतासोबतच क्रीडा क्षेत्रातही लखानी यांचे मोठे योगदान आहे. ते महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे (MBA) अध्यक्ष राहिले असून, त्यांनी बॅडमिंटन या खेळाला महाराष्ट्रात आणि विशेषतः विदर्भात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी भरीव कामगिरी केली आहे. लखानी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या पडद्यामागील रणनीतीत आणि आर्थिक नियोजनात सक्रिय आहेत. सध्या ते भाजपचे प्रदेश सह-कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पक्षाच्या आर्थिक बाबी आणि व्यवस्थापनात त्यांचा मोठा हातखंडा मानला जातो.
याशिवाय लखानी हे शहरी पाणीपुरवठ्यासाठी ‘नीती आयोगा’चे सल्लागार आणि कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती ट्रस्टचे अध्यक्ष, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी रुणाधार ट्रस्ट. या ट्र्स्टच्या माध्यमातून विशेषतः आदिवासी भागातील मुलांसाठी ‘एकलव्य एकल विद्यालया’च्या माध्यमातून 1 हजार 135 एक-शिक्षकी शाळांमधून आज 30 हजार 382 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच 160 पेक्षा अधिक छोट्या-छोट्या व्यवसायांसाठी मदत करून त्याद्वारे स्वयंरोजगार निर्माण करण्यात आला आहे. आदिवासी भागातील मुलांसाठी विविध खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि हजारो महिलांसाठी बचत गटांची निर्मिती करून या संस्थेने विदर्भातील ग्रामीण भागात एक मोठा बदल घडवून आणला आहे. गेल्या 29 वर्षांपासून हे कार्य अविरत सुरू आहे. नितीन गडकरी साहेबांनी या संस्थेचे पालकत्व स्वीकारले असून, कोणताही गाजावाजा न करता हे काम सुरू आहे. विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील तरुण मुली, मुले यांच्यासाठी देखील मोठी मदत त्यांच्या रुणाधार ट्रस्टच्या माध्यमातून होते.
लखानी यांना उमेदवारी देण्यामागची ‘राजकीय गणिते’
खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती आणि अरुण लखानी यांचे सुपुत्र रोहन लखानी यांच्या साखरपुड्यामुळे अरूण लखानी यांच्या नावाची मध्यंतरी जोरदार चर्चा झाली. या नात्यामुळे ते थेट पवार कुटुंबाशी जोडले गेले. भाजपने अरुण लखानी यांना चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघातून मैदानात उतरवण्यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. यात चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली हा परिसर विदर्भाचा महत्त्वाचा पट्टा आहे. लखानी हे नागपूरचे असल्याने या संपूर्ण परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींशी आणि उद्योजकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी लागणारी ‘आर्थिक आणि संघटनात्मक ताकद’ त्यांच्याकडे आहे.
लखानी यांनी नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात न राहता पक्षासाठी मोलाचे काम केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांशी त्यांचे अत्यंत निकटचे आणि विश्वासाचे संबंध आहेत. या निष्ठेचे फळ म्हणून पक्षाने त्यांना थेट सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या नक्षलग्रस्त आणि खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या भागात पायाभूत सुविधांचा विकास करणे गरजेचे आहे. लखानी यांचा इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील दांडगा अनुभव या भागाच्या विकासासाठी आणि पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरेल, हा विचार करूनच पक्षाने हा मास्टरस्ट्रोक खेळला आहे.
महिन्याभरापूर्वी भाजपने सुनील कर्जतकर, ॲड. माधवी नाईक, प्रमोद जठार आणि संजय भेंडे यांना विधानपरिषदेची संधी दिली. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की, समाजातील सर्वच घटकांना प्रतिनिधित्व देण्याची आणि पक्ष व समाजासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्यांना संधी देण्याची पद्धत फक्त भाजपमध्येच आहे. वर्षानुवर्षे संघटनेचे काम करायचे, पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडायची, तेव्हा कुठे पक्ष कधीतरी मोठी संधी देतो हेच लखानी यांना मिळालेल्या उमेदवारीवरून स्पष्ट झाले आहे. अरुण लखानी यांच्या उमेदवारीमुळे भाजपने विदर्भातील आपली पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला असून, एकाच वेळी उद्योग, क्रीडा आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रांतील त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याचे निश्चित केले आहे. आता या हाय-प्रोफाईल निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.