Video : ”मी लेक असल्याने सोबत होते, पण त्यांनी मला गप्प बस म्हणत हात केला”

मी लेक असल्याने त्यांच्यासोबत असते. तुम्ही जास्त चालू नका, तुम्ही जाऊ नका असं म्हणत असते. ते ओव्हर इंडिपेंडट असतात.

  • Written By: Published:
Letsupp Image   2026 07 15T130007.268

Supriya Sule Reveals Why Sharad Pawar Said Keep Quiet You Donot Understand : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. या भेटीमागे राजकीय समीकरणे बदलत असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांना आता खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी त्यांनी पवार साहेब खूप ओव्हर इंडिपेंडट स्वभावाचे असल्याचे सांगत त्यांनी मला हात करून ‘तू गप्प बस, तुला कळत नाही’ असे म्हणत ते पुढे निघून गेल्याचे सांगितले. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

पवार साहेब ओव्हर इंडिपेंडट 

पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची भेट पूर्णपणे योगायोगाने झाली होती. त्या म्हणाल्या, “पवार साहेब विधानसभेकडे चालत निघाले होते. मी लेक असल्याने नेहमी त्यांच्यासोबत असते. त्यांना जास्त चालू नका, जाऊ नका असे सांगत असते. पण ते खूप ओव्हर इंडिपेंडट स्वभावाचे आहेत. त्यावेळी त्यांनी मला हात करून ‘तू गप्प बस, तुला कळत नाही’ असे सांगितले आणि ते पुढे निघून गेले.”

शिंदे-पवारांची भेट कशी झाली?

सुळे यांनी शिंदे आणि-पवारांची भेट कशी झाली याबद्दल सविस्तर सांगितले. त्या म्हणाल्या की, परत येताना काही आमदारांनी पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ते शेजारच्या कक्षात गेले. त्याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेथे आले.”शिंदे साहेबांनी पवार साहेबांचे स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ दिला आणि काही वेळ संवाद साधून ते निघून गेले. हा त्यांचा मोठेपणा होता. चांगल्या गोष्टीला चांगले म्हणायलाच हवे,” असे सुळे म्हणाल्या.

‘संजय राऊतांना मी स्वतः फोन केला’

शिंदे आणि पवार यांच्या भेटीनंतर ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.  या भेटीनंतर राऊत नाराज असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यावर बोलताना सुळे म्हणाल्या की, “मी स्वतः राऊत साहेबांना फोन करून संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले.”

‘प्रत्येक भेट म्हणजे कटकारस्थान नसते’

राजकीय नेत्यांच्या भेटींवरून होणाऱ्या चर्चांवरही सुळे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या, “काल माझा नाश्ता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झाला, तर दुपारचे जेवण डिंपल यादव यांच्यासोबत झाले. मग त्यावर कोणी प्रश्न का विचारत नाही? योगी आदित्यनाथ यांची भेट ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विषयावर होती. तर डिंपल यादव आणि अखिलेश यादव यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. राजकारणात नेते एकमेकांना भेटतात म्हणजे प्रत्येक वेळी त्यामागे काही कटकारस्थान असते, असे समजणे योग्य नसल्याचेही सुळे यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटलांची फडणवीसांची भेट अधिकृत 

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेटही अधिकृत होती, असे सुळे म्हणाल्या. नगराध्यक्षांच्या कामासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. ते अधिकृतपणे गेले आणि अधिकृतपणेच परत आले. त्यात कोणतेही गुपित नव्हते, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण भेटायला जाते, हे त्यांनाच अधिक माहीत असेल. आमच्या पक्षाचे नेते त्यांच्या कामानिमित्त गेले होते. ते पुढच्या दरवाजाने गेले आणि त्याच मार्गाने परत आले, असे म्हणत सुळे यांनी सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

follow us