मी 20 तारखेपर्यंत जिवंत राहील… 20 दिवसांच्या उपोषणानंतर असं का म्हणाले सोनम वांगचुक?
सोनम वांगचुक आणि त्यांच्या आंदोलनाशी संबंधित सदस्यांनी पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक (Delhi) गेल्या 20 दिवसांपासून उपोषण करत असून, त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी विनोदी शैलीत, मी कोणत्याही परिस्थितीत 20 जुलैपर्यंत जिवंत राहीन. त्यानंतर आमचा मोर्चा यशस्वी झाला नाही, तर भूत बनून परत येईन, असं वक्तव्य केलं आहे.
वांगचुक यांनी 20 जुलै रोजी संसदेकडे काढण्यात येणाऱ्या मोर्चाचा उल्लेख करत हे वक्तव्य केले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपण कोणत्याही परिस्थितीत 20 जुलैपर्यंत टिकून राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे हे वक्तव्य गंभीर परिस्थितीत विनोदी पद्धतीने केले असले, तरी त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
दरम्यान, शुक्रवारी काँग्रेसचे खासदार पवन खेरा यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. यापूर्वी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. उपोषणाच्या 20 व्या दिवशी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक यांचे वजन 56.55 किलो इतके झाले असून, गेल्या 24 तासांत त्यात 350 ग्रॅमची घट झाली आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण सध्या नियंत्रणात असले, तरी डिहायड्रेशनची लक्षणे दिसून येत आहेत.
डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवत असून, दीर्घकाळ उपोषण सुरू राहिल्यास अवयव निकामी होण्याचा धोका असल्याचा इशाराही यापूर्वी देण्यात आला होता. सोनम वांगचुक आणि त्यांच्या आंदोलनाशी संबंधित सदस्यांनी पेपर लीक प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काँग्रेस, समाजवादी पक्षासह अनेक विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, वांगचुक यांच्या प्रकृतीची स्थिती आणि 20 जुलै रोजी होणाऱ्या प्रस्तावित मोर्चाकडे देशाचे लक्ष लागले आहे.