TET पेपर लीकप्रकरणी पोलिसांकडून धक्कादायक माहिती; दिल्ली हरियाणा कनेक्शन काय?

भिवंडी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून यातील 2 आरोपी बिहारमधील आहेत, तर एक आरोपी हरियाणामधला आहे.

News Photo   2026 06 27T171538.701

महाराष्ट्रात टीईटी पेपर फुटीने वादळ उठलं आहे. (TET) या प्रकरणात आता दिल्ली अन् हरयाणा कनेक्शन समोर आलं आहे. उद्या रविवार (दि. 28 जून)रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. विमानतळ परिसरातून भिवंडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर, अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीईटी पेपर फुटीसंदर्भात माहिती दिली.

भिवंडी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून यातील 2 आरोपी बिहारमधील आहेत, तर एक आरोपी हरियाणामधला आहे. दीड कोटी रुपयांत या पेपरचा व्यवहार ठरला होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही पेपरफुटी समोर आली. टीईटी पेपर विक्रीसाठी आरोपि दिल्लीतून आले होते. त्यामध्ये, राजीव शाह (बिहार), आकाश कुमार (बिहार) आणि धीरज कुमार (हरियाणा) अशी आरोपींची नावे असून त्यांचे वय अनुक्रमे 45, दुसरा 30 आणि तिसऱ्याचं 28 वर्षे आहे. मात्र, याप्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे.

आरोपींकडून या पेपर विक्रीसाठी दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पोलिसांच्या झडतीत 4 सेट पेपर मिळाले असून ⁠मोबाईल डेबिट कार्ड देखील मिळाले आहेत. पोलिसांनी, गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींसाठी ट्रॅप लावण्यात आला होता. आरोपी दिल्लीवरुन पेपर विकण्यासाठी भिंवडीला आले होते, कोणासाठी पेपर विकायला आले होते, कोणाला विकला, कुणी घेतला? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत आहे.

मोठी बातमी! TET पेपर लीक प्रकरणात तिघांना अटक, परीक्षा परिषद उपायुक्त प्रिया शिंदे लेट्सअप मराठीवर काय म्हणाल्या?

विशेष म्हणजे, आरोपींकडून जे पेपर विकत घेणार होते, ते विविध रकमा घेऊन पुढे विकणार होते, अशी माहिती समोर आल्याचेही पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी दिली. पोलिसांना आढळून आलेले ⁠पेपर शिक्षण विभागाला पाठवले, ⁠त्यांनी पेपर पडताळले असता ⁠हे पेपर त्याच परीक्षेचे आहेत, असे निष्पन्न झाल्याची माहितीही दुधे यांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी स्पेशल SIT नेमण्यात आली असून ⁠डीसीपी पवन बनसोडे यांच्यामार्फत ही टीम नेमली आहे. आरोपींना पेपर कुठून मिळाला हे तपासातून कळेल, सर्व शक्यता गृहीत धरली आहे.

याप्रकरणातही ⁠कोचिंग सेंटर आणि सर्वांची चौकशी करणार असून पेपर घेऊन दिल्लीहून आरोपी इथं पोहोचले आहेत. प्राथमिक तपासात शिक्षण विभागाचा सहभाग आढळला नाही, ⁠यातील एका आरोपी केंद्रीय विद्यालयात नोकरी लावण्यासाठी पैसे दिले होते, तर ⁠एका आरोपीने TET ची परीक्षा दिली असून तो त्यात नापास झाला होता. 28 जून, 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा पुढं ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अ‌द्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील 6 लाख 128 शिक्षकांसाठी घेण्यात येणारी टीईटी परीक्षा रद्द करण्यात आली असून ह्या परीक्षेसाठी पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. त्यामुळे, परीक्षेसाठी राज्यातील 6 लाख 128 परिक्षार्थींकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. येत्या 2 ते 3 दिवसांनी टीईटी परीक्षेची नवीन तारीख घोषीत केली जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी दिली.

follow us