जुनी पेन्शन, टीईटीच्या सक्तीपासून अशैक्षणिक कामांपर्यंत… शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी डॉ. बब्रुवाहन रोंगे मैदानात!

Dr Babruvahan Ronge; डॉ. रोंगे पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यावर भूमिका मांडली.

Dr Babruvahan Ronge On Pune Teachers Constituency

Dr Babruvahan Ronge On Pune Teachers Constituency: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जवळपास 40 वर्षांचा शिक्षण क्षेत्रातील अनुभव असलेले रोंगे यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जुनी पेन्शन योजना, शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती आणि शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे या मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिक्षक, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शिक्षक मतदारसंघातून काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली. ‘लेट्सअप मराठी’शी संवाद साधताना त्यांनी आपल्या उमेदवारीमागील भूमिका आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर उपाययोजनांची गरज अधोरेखित केली.

‘रामायण’मध्ये लारा दत्ता आणि शीबा चढ्ढा यांची महत्त्वपूर्ण भूमिका; कैकेयी आणि मंथरेच्या रुपातील नवी पोस्टर्स प्रदर्शित

‘जुन्या पेन्शनचा प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडवणार’

जुनी पेन्शन योजना हा शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असल्याचे डॉ. रोंगे यांनी सांगितले. नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत रुजू झालेले, मात्र अंशतः अनुदानित किंवा विनाअनुदानित संस्थांमध्ये काम केल्यामुळे जुन्या पेन्शनचा लाभ न मिळालेले शिक्षक आजही या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. अशा शिक्षकांची संख्या महाराष्ट्रात सुमारे 26 हजार असल्याचा दावा त्यांनी केला.

या शिक्षकांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे रोंगे म्हणाले. गेल्या 21 वर्षांत हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला गेला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून तो योग्य व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाल्यास शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जुन्या शिक्षकांना टीईटीच्या सक्तीतून सूट देण्याची मागणी

शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटीच्या (Teacher Eligibility Test) सक्तीबाबतही डॉ. रोंगे यांनी भूमिका मांडली. जुन्या शिक्षकांना टीईटी देण्याची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Video : 40 वर्षांचा अनुभव, शिक्षकांचे प्रश्न अन् विधानपरिषदेची निवडणूक; डॉ. बब्रुवाहन रोंगेंनी मांडला आपला पट

2010 किंवा 2013 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना टीईटीच्या सक्तीतून सूट देण्यासाठी कायद्यात आवश्यक दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे रोंगे यांनी नमूद केले. या विषयावर संसदेच्या माध्यमातून कायदेशीर बदल घडवून आणता येऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे जुन्या शिक्षकांच्या सेवेसंदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी धोरणात्मक पातळीवर पाठपुरावा करण्यावर त्यांचा भर आहे.

शिक्षकांना अशैक्षणिक कामांमधून मुक्त करण्याची गरज

शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त अनेक अशैक्षणिक कामे दिली जातात. याचा परिणाम केवळ शिक्षकांच्या कामावर होत नाही, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही होतो, असे डॉ. रोंगे यांनी सांगितले.

Gajanan Kirtikar : एकनाथ शिंदेंना धक्का, बडा नेता करणार पुन्हा ठाकरे गटात प्रवेश ?

शिक्षण क्षेत्रातील आपल्या अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी 17 वर्षे प्राध्यापक आणि 23 वर्षे प्राचार्य म्हणून काम केल्याचे नमूद केले. या काळात शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्न जवळून अनुभवले आहेत. शिक्षकांना त्यांच्या मूळ कामापासून दूर ठेवणारी अशैक्षणिक कामे लावणे अन्यायकारक आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, शिक्षकांचा वेळ अशा कामांमध्ये गेल्याने विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीऐवजी शिक्षक मतदारसंघ का?

राजकारणात सक्रिय होण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्याऐवजी शिक्षक मतदारसंघाची निवड का केली, या प्रश्नावरही डॉ. रोंगे यांनी उत्तर दिले. जवळपास 40 वर्षांचा अनुभव शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे याच क्षेत्रातील प्रश्न सोडवण्याला आपण प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षकांच्या समस्यांबरोबरच शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि विद्यार्थ्यांसमोर असलेले अनेक प्रश्न सोडवण्याची गरज आहे. या प्रश्नांवर काम करण्यासाठी शिक्षक मतदारसंघ हे योग्य व्यासपीठ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठीच आपण निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘अनुभव, प्रामाणिकपणा आणि अभ्यासपूर्ण मांडणी ही माझी ताकद’

आपल्याला निवडून का द्यावे, याबाबत बोलताना डॉ. रोंगे यांनी शिक्षण क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि प्रश्न सोडवण्याची तळमळ ही आपली प्रमुख ताकद असल्याचे सांगितले. शिक्षकांच्या समस्या समजून घेणे, त्यांचा अभ्यास करणे आणि त्या योग्य पद्धतीने मांडून सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठी आपल्याकडे आवश्यक अनुभव असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार

चिकाटी, प्रामाणिकपणा आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्न हाताळण्याची जिद्द या गुणांच्या जोरावर आपण शिक्षकांचे प्रश्न सोडवू शकतो, असे रोंगे म्हणाले. याच विश्वासातून पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जुनी पेन्शन योजना, टीईटीची सक्ती आणि अशैक्षणिक कामांचा भार हे शिक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत. या प्रश्नांवर ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत डॉ. बब्रुवाहन रोंगे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

follow us