नीट पेपर लीक प्रकरणावर केलं भाष्य; JNUच्या प्राध्यापकावर होणार कारवाई?
60 हजार टोकन आणि 10 लाख प्रति पेपर अशी योजनाबद्ध फसवणूक करण्यात आली, ज्यात सुमारे 5.74 कोटींहून अधिक रक्कम उकळण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.
नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात (Neet) टेलिग्राम ॲपचा वापर करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. सायबर गुन्हेगारांनी ‘लीक पेपर’, ‘गॅरंटी सिलेक्शन’सारखे ग्रुप्स बनवून विद्यार्थी आणि पालकांना लक्ष्य केलं. 60 हजार टोकन आणि 10 लाख प्रति पेपर अशी योजनाबद्ध फसवणूक करण्यात आली, ज्यात सुमारे 5.74 कोटींहून अधिक रक्कम उकळण्यात आली असल्याचं समोर आलं आहे. अशातच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथील तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि ‘भूरा’ पुस्तकाचे लेखक शरद बाविस्कर यांनी नीट पेपर लीक प्रकरणावर भाष्य केल्यानेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जेएनयुमधीलच काही लोकांनी केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर बाविस्कर यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून मत मांडलं आहे.
नीट पेपरफुटीतील मनीषा हवालदार मोबाईलमधील ‘गॉड’ नावाने सेव्ह नंबरचं गुढ उकललं
आपल्या पोस्टमध्ये काय म्हणाले बाविस्कर?
सद्सद्विवेकबुद्धीचा गळा घोटून मला जगता येत नाही!
NEET परीक्षेच्या पेपरफुटी सारखा धक्कादायक प्रकार समोर आल्यावर त्यासंदर्भात मी १६ मे रोजी फेसबुकवर “ते जेएनयूसाठी आले होते तेव्हा आपण फक्त गंमत बघत होतो. आता मात्र ते तुमची NEET पण घेऊन गेले!” अशा आशयाची पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये जेएनयूत आणि एकूणच शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या वाताहती विषयी भाष्य केलं आहे. अशा सार्वजनिक हिताच्या विषयांवर भाष्य करणं माझा अधिकारच नव्हे तर एक शिक्षक म्हणून मी माझं कर्तव्य समजतो.
पण विडंबना पहा! या पोस्टचा आधार घेऊन माझ्या विरोधात जेएनयू प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. कठोर कारवाईची मागणी करण्यात आहे. आधीच जेएनयूत सामाजिक न्यायाची बाजू उचलून धरल्यामुळे आमच्यावर चार्जशीटची टांगती तलवार आहे. आता परत आरोप करण्यात आला आहे की माझ्यामुळे जेएनयूची प्रतिमा डागाळली जात आहे.
माझ्या जीवनात शिक्षणाचं आणि त्यात जेएनयूचं काय स्थान आहे याविषयी आपल्यापैकी अनेकांना ठाऊक आहे. खरंतर, शिक्षणाने आमच्या सारख्यांना प्रतिकूल परीस्थितीतून बाहेर पडण्याची दृष्टी आणि बळ दिलं आहे. त्यामुळे गेल्या पंचवीस वर्षांपासून शिक्षण माझ्या चिंतनाचा विषय राहिला आहे. माझी पीएचडी शैक्षणिक तत्वज्ञानाविषयी आहे. त्यामुळे मी जेएनयूची बदनामी केली हा आरोप किती हास्यास्पद आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा! खरंतर आपण हास्यास्पद युगात जगत असल्याने आपल्याला अशा बोंबा ऐकण्याची हळूहळू सवय झाली आहे.
मित्रहो, जे भाष्य मी माझ्या फेसबुक पोस्टमध्ये केलं तेच ‘भुरा’ मध्ये सविस्तरपणे आणि प्रखरपणे केलं आहे. विद्यार्थीदशेत अनुभवलेलं जेएनयू, नंतर भोडोत्री मिडिया आणि आयटीसेलने केलेल्या चरित्रहननामुळे समाजात निर्माण झालेली जेएनयूची नकारात्मक प्रतिमा आणि काही वर्षांपासून होणारी जेएनयूची दुरावस्था, असं विश्लेषण करून जेएनयूच्या बाबतीत पसरविण्यात आलेले अनेक गैरसमज आणि भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाच्या आतापर्यंत अठरा आवृत्त्या प्रकाशित होऊन पाच सहा विद्यापीठांमध्ये शिकवलं जात आहे. खरंतर, सदर व्यक्तीने माझं पुस्तक वाचलं असतं तर पुस्तकावर कारवाईचा आग्रह धरला असता!
जेएनयूतील सहकार्यांशी सल्लामसलत करून वेळ आल्यावर प्रशासनाला योग्य ते अधिकृत स्पष्टीकरण देईन. पण त्याआधी माझ्या सोशल मीडियावरील लिखाणावर पाळत ठेवून माझ्या विरोधात कुरापती करणार्यांसाठी इथं लिहणं आवश्यक आहे.
खरंच, माझं लिखाण जेएनयूला अप्रतिष्ठा आणणारं आहे का? NEET परीक्षेविषयी समोर येणारे तपशील धक्कादायक आहेत. लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. काही मुलांनी आत्महत्या केल्या. अशा क्लेशदायक परिस्थितीत आमच्या सारख्यांनी सुद्धा व्यक्त होऊ नये असं व्यवस्थेकडून अपेक्षित आहे! जे काही चालू आहे ते निमूटपणे कुठल्याही प्रकारचा विरोध न करता सहन करावं असा संदेश दिला जात आहे. त्यामुळे अनेक लोक auto- censorship मध्ये जगताना दिसतात.
माझ्यावर सुद्धा मानसिक दबाव आणून माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न आहे. तर अशा लोकांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की असं करू नका. मी तत्त्वज्ञानाचा अभ्यासक आहे. त्यात
मैदान सोडणाऱ्यांपैकी मी नाही आहे. जेएनयूची नोकरी खैरातमध्ये किंवा कुणाच्या मेहरबानीमुळे मिळाली नाही. माझ्या सगळ्या पदव्या खर्या असून परिश्रमांती मिळविलेल्या आहेत.
कालपासून अनेक समविचारी हितचिंतकांचे चिंता व्यक्त करणारे मेसेजेस आले. तर काहींना मात्र राजीनामा या शब्दामुळे आनंद झालेला दिसला. लक्षात असू द्या की जेएनयू जनतेचं विश्वविद्यालय आहे. कुणाची खाजगी मालमत्ता नाही. याची जाणीव असल्यानेच मी जेएनयूत अध्ययन आणि अध्यापनाचा मार्ग निवडला आहे. कारण मला माहिती आहे की जेएनयू माझ्या सद्सद्विवेकबुद्धीशी द्रोह करायला भाग पाडणार नाही. त्यामुळे परिस्थिती कितीही बिकट झाली तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य या माझ्या मूलभूत हक्कासाठी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष दिला जाईल. सोबतच मला कल्पना आहे की या लोकांमध्ये किती क्रौर्य भरलेलं आहे! ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. असं असलं तरी भीतीपोटी यांना शरण जाणं म्हणजे माझ्या सद्सद्विवेकबुद्धीशी प्रतारणा ठरेल. एक नागरिक म्हणून माझा सत्यानुनय थांबणार नाही.
-शरद बाविस्कर