Sushma Andhare on Devendra Fadnavis : महिला आरक्षण विधेयकावरून सुरू असलेला राजकीय कलगीतुरा आता ‘स्तर’ आणि ‘पुराव्यांच्या’ लढाईत रूपांतरित झाला आहे. ‘माझ्या तोडीचा नेता असेल तर चर्चेला या’ या फडणवीसांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्यांच्या जुन्या ट्विट्सची जंत्रीच सादर केली. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये ‘विधेयक मंजूर’ झाल्याचे जल्लोषी ट्विट केले असताना, आज विरोधकांमुळे विधेयक रखडल्याचा दावा करणे म्हणजे सत्याची ‘भ्रूणहत्या’ आहे, अशा शब्दांत अंधारे यांनी फडणवीसांवर घणाघाती टीका केली. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
फडणवीसांनी त्याला ऐतिहासिक क्षण म्हटले होते
अंधारे यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२३ मध्ये केलेली ट्विट्स वाचून दाखवली. “२०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्याचे ट्विट अमित शहा यांनी केले होते आणि फडणवीस यांनी त्याला ‘ऐतिहासिक क्षण’ म्हटले होते. जर हे विधेयक तेव्हाच मंजूर झाले होते, तर आता फडणवीस विरोधकांमुळे विधेयक पडल्याचे खोटे का सांगत आहेत?” असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदींचे २०२३ मधील भाषण ऐकवत त्यांनी फडणवीसांच्या दाव्यांमधील फोलपणा उघड केला.
‘भ्रूणहत्या’ शब्दावरून फडणवीसांना टोला
विधेयकाच्या संदर्भात फडणवीस यांनी वापरलेल्या ‘भ्रूणहत्या’ या शब्दाचा सुषमा अंधारे यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला. “या शब्दाचे गांभीर्य फडणवीसांना कळलेले नाही. महिला आरक्षणाची पहिली भ्रूणहत्या १९५१ मध्ये झाली, जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बिल मांडत होते. त्यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय यांनीच त्याला कडाडून विरोध केला होता,” असे सांगत त्यांनी इतिहासाची आठवण करून दिली.
बाबासाहेबांप्रमाणे राजीनामा देण्याची हिंमत आहे का?
1951 मध्ये महिलांच्या हक्कासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या घटनेचा संदर्भ देत अंधारे यांनी फडणवीसांना आव्हान दिले की, “महिलांच्या आरक्षणासाठी तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवणार का?”
RSS आणि महात्मा फुलेंची पुस्तके
सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना एक आगळेवेगळे आव्हान दिले. “महात्मा फुले यांनी लिहिलेली ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ ही दोन पुस्तके देवेंद्र फडणवीस यांनी आरएसएसच्या (RSS) वार्षिक कार्यक्रमात वाचून दाखवावीत आणि त्यावर मोहन भागवत यांची काय प्रतिक्रिया आहे, हे जगाला सांगावे,” असे त्या म्हणल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना रंग बदलणारा सरडा, असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नाही.
स्तराची भाषा आणि महिलांचा अवमान
सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांच्या संदर्भात फडणवीस यांनी वापरलेल्या ‘स्तरा’च्या भाषेवर अंधारे यांनी संताप व्यक्त केला. “फडणवीस साहेब, तुमचा स्तर नेमका कोणता? तुम्ही सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांच्या उत्तरांना नाकारता, याचा अर्थ तुम्ही महिलांना तुच्छ समजता. तुमच्यात ‘चांगदेवाचा अहंकार’ भरला आहे,” अशी टीका त्यांनी केली. तसेच नाव न घेता चित्रा वाघ यांच्यावर ‘चित्र-विचित्र’ म्हणत त्यांनी निशाणा साधला.
फडणवीसांना थेट चॅलेंज: २०२९ ला महिला मुख्यमंत्री करणार का?
सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. “तुम्ही वेळ आणि दिवस ठरवा, मी चर्चेला यायला तयार आहे. जर तुम्ही चर्चेला आला नाहीत, तर तुम्ही सत्याला घाबरता असा त्याचा अर्थ होईल,” असे त्या म्हणाल्या. सोबतच, “२०२९ मध्ये तुमचे सरकार आले, तर देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री महिला असेल, असे जाहीर करण्याची हिंमत भाजप दाखवेल का?” असा थेट प्रश्न त्यांनी विचारला.
