शिवसेना शिंदे गटाकडून (Operation Tiger) ऑपरेशन टायगरसंदर्भात पुरावा सादर केला जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून मागणी करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. मात्र दुसरीकडे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.
दरम्यान आता या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ऑपरेशन टायगरबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. अंधारे यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांच्या बैठकीतला एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ते लोकसभेच्या अध्यक्षांसोबत बसलेले आहेत. यावर बोलताना सुषमा अंधारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ऑपरेशन टायगरचा प्लॅन हा 4 महिन्यांपासूनच शिजत होता, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे, सुषमा अंधारे यांच्या या दाव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर खासदार संजय दिना पाटील यांची मुलगी राजुल पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे, या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना राजुल पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मी अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच आहे, भविष्यात माझे वडील आणि माझी राजकीय वाटचाल वेगळी असेल असं त्यांनी म्हटलं आहे. यावर देखील यावेळी सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्हाला या लोकांवर विश्वास नाही, त्यांची पोरं आमच्यासोबत राहतील यावर विश्वास कसा ठेवायचा? खासदारांची पोरं आमच्यासोबत आहेत या भ्रमात आम्ही नाही, असं यावेळी सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान सुषमा अंधारे यांना धमकी देखील येत आहेत, यावर बोलताना मला धमकी येत आहे, त्यासंदर्भात मी पोलिसात तक्रार दिल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
