Teachers’ march to Pune District Collector’s Office : शिक्षकांना टीईटी (TET) परीक्षा बंधनकारक केल्याच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शुक्रवारी (दि.5 डिसेंबर) हजारोंच्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुणे (Pune) जिल्हा परिषद कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. तसेच त्यानंतरही शासनाने (Government) टीईटी परीक्षा रद्द करण्यासाठी हालचाली केल्या नाही; तर दुसऱ्या टप्प्यात येत्या 9 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आणि तिसऱ्या टप्प्यात मुंबईतील आझाद मैदानावर यापेक्षाही मोठ्या संख्येने भव्य मोर्चा (March) काढला जाईल, असा इशारा शासनाला यावेळी देण्यात आला. तसेच मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी (Collector) यांना देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळाचे समन्वयक शिवाजी खांडेकर(Shivaji Khandekar) व बाळासाहेब मारणे(Balasaheb Marane) यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक झाले आहे. तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करावी, आदी प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला. त्यानुसार शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील शाळा बंद ठेऊन हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुण्यात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभाग घेतला. शिवाजी खांडेकर व बाळासाहेब मारणे यांच्यासह शिक्षण समितीचे नंदकुमार होळकर, संस्थाचालक शिक्षण मंडळाचे विजय कोलते, मुख्याध्यापक संघटनेचे नंदकुमार सागर, के. एस. डोमसे, मनपाचे सचिन डिंबळे, शिवाजी कामठे आदींनी मोर्चात मनोगत व्यक्त करून शासनाच्या धोरणावर टिका केली. मुख्याध्यापक,प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी मोर्चाला पाठिंबा दिला.
आमदार सुरेश धस याचं ब्रेनमॅपिंग झालं पाहिजे; खाडेंच्या हल्ल्यावरून शेख यांचा थेट आरोप
शिवाजी खांडेकर म्हणाले, एकदा सर्व प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर शिक्षक म्हणून 20 ते 25 वर्षे सेवा झालेल्या शिक्षकाला टीईटी परीक्षा अनिवार्य करणे अन्यायकारक आहे. जिल्हाधिकारी पदावर काम करणारे अधिकारी सेवा दिल्यानंतर पुन्हा युपीएससी परीक्षा देत नाहीत. मग शिक्षकांना टीईटी परीक्षा का? तसेच आमदार, खासदार यांना पेन्शन लागू होते. मग शिक्षकांना का डावलले जाते? त्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे. आजचे आंदोलन हा केवळ इशारा आहे. यापुढे नागपूरला हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिवेशनावर मोर्चा काढतील. त्यानंतरही शासनाने मागण्या मान्य केल्या नाही. तर लाखोंच्या संख्येने सहकुटुंब आझाद मैदानावर मोर्चा काढला जाईल.
बाळासाहेब मारणे म्हणाले, टीईटी परीक्षा लादणे चुकीचे आहे. शिक्षकांना शालाबाह्य कामे दिल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही. मराठी शाळा वाचल्या पाहिजे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या एकजूटीमुळे हा भव्य मोर्चा निघाला. आपल्या एकीमुळे शासनाला प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी शासनाला भाग पाडू. त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागली तरी चालेल.
दरम्यान, ‘आमचा लढा कशासाठी शाळा शिक्षक वाचवण्यासाठी, माणूस म्हणून जगण्यासाठी आम्हाला सार करायचं’ आज नाही उद्याला लढायचं तर मग मागे कशाला सरायचं, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे, शिक्षकांची शालाबाह्य कामे बंद केली पाहिजे, शिक्षक व शिक्षकेतर भरती झाली पाहिजे, अशा अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या.
