फ्लायओव्हर आहे की ‘फ्लॉ’ओव्हर? नागरिकांच्या जीवाशी खेळ; नगरसेवक सनी निम्हण यांनी दाखविला आरसा
Sunny Nihman-स्ट्रक्चरल ऑडिट न करता आणि तांत्रिक चुकांकडे बिनधास्तपणे दुर्लक्ष करण्याचे धाडस पीएमआरडीएनी केले आहे हे मला सहज उमजते.
Sunny Nimhan On PMRDA Work: पुणे विद्यापीठ चौकात पीएमआरडीएमार्फत (PMRDA) साकारण्यात येत असलेल्या डबल डेकर फ्लायओव्हरच्या बाणेर रॅम्पचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले आहे. हा फ्लायओव्हर उभा असलेल्या पुलामध्ये त्रुटी असल्याचे नगरसेवक सनी निम्हण ( Sunny Nimhan ) यांनी दाखवून दिले आहे. पुलाचे वास्तव दाखवणारा फोटो त्यांनी दाखविला आहे. ज्यांची ओळख ‘परफेक्शनिस्ट’ अशी होती आणि प्रत्येक कामात बारकाईने लक्ष घालून ते काम फ्लॉलेस करण्याकडे ज्यांचा भर असायचा त्या स्व. अजितदादा पवार यांचे नांव या उड्डाणपूलाला देण्यात येणार आहे हा आता केवढा विरोधाभास आहे, असा टोलाही निम्हण यांनी लगावला आहे.
या जागेवर आधी एक उड्डाणपूल होता तो चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांनी तो पूल पडण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यावर टीका झाली पण पुण्याच्या आणि पुणेकरांच्या भल्यासाठी हा निर्णय हिताचा असणार म्हणून तो टीका त्यांनी सहन केली. पुढच्या २५-५० वर्षांचा विचार करता या चौकातील वाहतूक कोंडीमुक्त होण्यासाठी हा डबल डेकर फ्लायओव्हर साकारण्याचा निर्णय झाला. त्यात असे स्ट्रक्चरल डिफेक्ट्स ठेऊन घाईघाईने उद्घाटन करण्याचा घाट कशासाठी? इतक्या महत्वाच्या आणि महाकाय प्रकल्पाचे काम करताना पीएमआरडीए प्रशासन असे काम करत असेल तर बाकी छोट्या मोठ्या प्रकल्पांचे काय होत असेल? ज्या पुलावरून रोज हजारो वाहने धावणार आहेत तिथे असे ब्लँडर्स करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करण्याचा अधिकार पीएमआरडीएला कुणी दिला? असा सवाल सनी निम्हण यांनी उपस्थित केलाय. माझे शिक्षण सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये झाले असल्याने याचे स्ट्रक्चरल ऑडिट न करता आणि तांत्रिक चुकांकडे बिनधास्तपणे दुर्लक्ष करण्याचे धाडस पीएमआरडीएनी केले आहे हे मला सहज उमजते. सामान्य माणसाने पण पुलाचा हा भाग बघितला तर झालेली चूक सहज लक्षात येईल.
मेट्रो व्हायाडक्ट हे साधारणपणे Prestressed Segmental Structure असतात.आतमध्ये Post-tensioning Cables असतात. हे केबल्सच मुख्य भार उचलतात. म्हणून बाहेर दिसणाऱ्या काही दोषांमुळे लगेच स्ट्रक्चर कोसळेल असे नसते. पण फोटोवरून असे वाटते की जॉइंट नीट बंद झालेला नाही, बांधकामाची गुणवत्ता कमी दिसते आणि त्यामुळे दीर्घकालीन टिकाऊपणावर परिणाम होऊ शकतो. अशाच प्रकारच्या चुकीमुळे मुंबईत एक अपघात झाला होता त्याची पुनरावृत्ती पुण्यात होऊ नये ही प्रामाणिक भावना असल्याचे सनी निम्हण यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे पुणे शहरावर विशेष लक्ष आहे. पुणे शहर हे येत्या काळात ग्लोबल कपॅबिलिटी सेंटर म्हणून विकसित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे व्हिजन आहे. त्यासाठी आताच्या अर्थसंकल्पात त्यांनी रस्ते, उन्नत मार्ग आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर केला आहे. असे पथदर्शी आणि दूरदृष्टीपूर्वक नियोजन असताना त्यावर काम करणारी शासकीय यंत्रणा अशी ढिसाळ आणि गंभीर चुका करणारी असेल तर ते व्हिजन कसे प्रत्यक्षात येणार?
मी सत्तेतल्या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरीही एक सुजाण पुणेकर म्हणून परखडपणे ही भूमिका मांडतोय. कारण मला माहित आहे ‘राष्ट्रप्रथम’ हे माझ्या पक्षाचे ब्रीद आहे. देशाच्या विकासाप्रती बेजबाबदार आणि असंवेदनशील दृष्टीकोन माझा पक्ष आणि आपले सरकार कधीच खपवून घेणार नाही. या फ्लॉ ओव्हरचे आता करायचे तरी काय? यावर पीएमआरडीए तात्काळ भूमिका जाहीर करेल आणि या चूकीवर ताबडतोब कार्यवाही होईल अशी अपेक्षा सनी निम्हण यांनी व्यक्त केली.
