Tejashwi Ghosalkar Resigns From Thackeray Group : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका आणि महिला दहिसर विधानसभा प्रमुख तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील स्थानिक नेतृत्वाविरोधातील नाराजीमुळे (Thackeray group) आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
राजीनामा दिल्यानंतर घोसाळकर यांनी विभागप्रमुख उदेश पाटेकर आणि महिला विभाग संघटक शुभदा शिंदे यांना वैयक्तिक कारणांचा हवाला देत राजीनामा सादर केला. मात्र, स्थानिक नेत्यांच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांनी वारंवार व्यक्त केलेल्या नाराजीला पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितलं.
राज्यात नव्या युतीची नांदी; चहा पिला अन् खिचडी खाता-खाता सामंतांची राज ठाकरेंना युतीची ऑफर
तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनाम्यात पक्षप्रमुख आणि कार्यपद्धतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, पण स्थानिक गटबाजीमुळे त्या नाराज होत्या. दहिसर हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असताना, हा राजीनामा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. उच्च न्यायालयाने चार महिन्यांत महापालिका निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचवेळी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना घोसाळकर यांच्या बंडखोरीने उत्तर मुंबईत पक्षाला धक्का बसला आहे.
मातोश्रीवरून तातडीने पावले उचलली गेली असून, घोसाळकर यांना चर्चेसाठी बोलावले आहे. पक्ष डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात आहे. सूत्रांनुसार, भाजपकडून घोसाळकर यांना ऑफर मिळाल्याची शक्यता आहे, ज्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई असलेल्या तेजस्वी यांच्या या पावलाने पक्षांतर्गत असंतोष उफाळण्याची भीती आहे. घोसाळकर पुढे काय करतात आणि ठाकरे गट या संकटावर कशी मात करतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
जीवे मारण्याची धमकी
गेल्या महिन्यात व्हाट्सअप ग्रुप वर तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हाट्सअप ग्रुप वर मेसेज शेअर करण्यात आला होता लालचंद इन को देखकर सुधार जा इसकी बीवी को मत मरवा देना लालचंद अशा प्रकारचा मॅसेज व्हाट्सअप ग्रुप वर व्हायरल झाला होता.
तेजस्वी घोसाळकर भाजपात?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घोसाळकर यांचे बोलणे झाले आहे.
दिवंगत अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेवर संचालक होते,त्यांच्याजागी आता तेजस्वी घोसाळकर यांना संचालक करण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते. सर्वात महत्त्वाचे हे देखील माहिती समोर येत आहे की पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वतीनं तेजस्वी यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मनीषा चौधरी ह्या दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहे. भविष्यातील म्हणजेच पुढील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाला तेजस्वी घोसाळकर यांच्या माध्यमातून नवीन चेहरा मिळणार आहे. तत्पपूर्वी अगदी काही महिन्यातच मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे. १ नंबर वॉर्डमधून त्या नगरसेविका होत्या.तेथूनच भाजप त्यांना या निवडणुकीत मैदानात उतरवू शकतो. एकंदरीतच महापालिका निवडणुकीत भाजपा उत्तर मुंबईतील दहिसर मतदार संघावर आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे.