मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे आरोप म्हाडाने खोटे ठरवले असून कार्यालय माझं नसल्याचं लेखी उत्तर म्हाडाने दिल्याची माहिती माजी मंत्री अनिल परब (Anil Parb) यांनी दिलीय. मुंबईतील बांद्रा येथील म्हाडा वसाहतीमध्यील शिवसेना आमदार अनिल परब यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे.
अनिल परब म्हणाले, म्हाडाच्या कार्यालायाकडून मला पाठवण्यात आलेली नोटीस कुठलीही शहानिशा न पाठवण्यात आली आहे. ज्या अधिकाऱ्यांनी मला ही नोटीस पाठवली आहे त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अनिल परबांनी केलीय.
तसेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कार्यालयाबाबत केलेले आरोप खोटे ठरवले असून मला म्हाडाने पाठवलेली नोटीस मागे घेतल्याचंही अनिल परबांनी स्पष्ट केलंय. नूकतीच अनिल परब यांचा म्हाडाच्या अधिकाऱ्यांसोबतची बैठक संपली असून त्यांनंतर अनिल परबांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
म्हाडाविरोधात मी कोर्टात जाणार असून ज्या अधिकाऱ्यांकडून मला नोटीस पाठवण्यात आलीय त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत. मला पाठवण्यात आलेली नोटीस कुठलाही पाठपुरावा न करता पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून माझ्यावर आरोप केले जात आहेत. त्यांच्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी मी बांधिल नसून एजन्सीला बांधिल असल्याचं अनिल परबांकडून सांगण्यात आलंय.
तसेच ही आग विरोधकांना भस्मसात केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. आज अनिल परब यांच्या बांद्रा इथलं कार्यालय म्हाडाकडून पाडण्यात आलंय. त्यावरुन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून म्हाडाच्या कार्यालयात राडा घालण्यात आला आहे. यावेळी शिवसैनिकांनी म्हाडाच्या कार्यालयातदेखील प्रवेश केल्याचं दिसून आलंय.