Download App

मुख्यमंत्री, पंतप्रधानही आता थेट जनतेतून निवडा – अजित पवार

कोल्हापूर : संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलाय, त्यात बहुमताला प्राधान्य देण्यात आलंय. काही गावांत सरपंच एका विचाराचा आणि सदस्य बॉडी एका विचाराची असते. त्यामुळं ग्रामपंचायतीचा खेळखंडोबा होतो.

सध्या सोयीचं राजकारण सुरु आहे. जर सरपंचाची निवड थेट जनतेतून करताय तर सभापती, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष अगदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवडही जनतेतूनच व्हायला हवी, असं स्पष्ट मत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं.

अजित पवार सध्या कौल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कारप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.

तुम्ही सरपंच झालात याच अर्थ तुम्ही गावचे कारभारी झाला आहात. यामुळं गावाचा सर्वांगीण विकास करणं तुमचं काम आहे. केंद्राच्या, राज्याच्या, जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबवून किंवा आमदार खासदार निधीमधून कामं कशी करता येतील ते पहा.

प्रयत्न केल्यास सीएसआर निधी देखील आपल्याला मिळू शकतो. तुम्ही लोकांमधून सरपंच झाल्याने तुम्हाला एक मोठी संधी मिळाली आहे, असे अजित पवार म्हणाले.

पवार पुढं म्हणाले, ‘बाबासाहेबांच्या संविधानानं सर्वांना सामान अधिकार दिला आहे. काही ग्रामपंचायतीत सरपंच वेगळ्या विचारांचा आणि सदस्य वेगळ्या विचारांचे निवडून येतात. यामुळं मोठी अडचण निर्माण होते.

अशावेळी एखादा ठराव करायचा झाल्यास एकमेकांचा मोठ्या प्रमाणात विरोध होतो. मात्र, असं असलं तरी माझे सर्व सरपंचांना सांगणं आहे की सर्वांना सोबत घेऊनच पुढे चाला. तरच गावाचा सर्वांगीण विकास होईल.’

Tags

follow us