Download App

Winter Session : नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाखुशीने का होईना, स्वीकारले असले तरीही गृह खात्याचा आग्रह कायम ठेवला आहे.

  • Written By: Last Updated:

Winter session coming soon : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले. मंत्रिमंडळाचा विस्तार हा ११ किंवा १२ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार असून त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे.

 सार्वजनिक बांधकाम

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद नाखुशीने का होईना, स्वीकारले असले तरीही गृह खात्याचा आग्रह कायम ठेवला आहे. मात्र, भाजपने त्यास ठाम नकार दिला असून त्याऐवजी महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते त्यांना देण्याचा प्रस्ताव दिला आहे. शिंदे यांनी आता शपथ घेतली असल्याने भाजपने शिवसेनेला (एकनाथ शिंदे) देऊ केलेली खाती शिंदे स्वीकारतील, असा विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे. शिवसेनेला ११ किंवा १२ मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसलाही तेवढीच मंत्रीपदे हवी आहेत.

CM होताच शरद पवारांच्या शिलेदारानं घेतली फडणवीसांची भेट; चर्चा तर होणारच..

भाजपकडे २० मंत्रीपदे असतील, पण त्यापैकी काही रिक्त ठेवली जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कोणाला संधी द्यायची, याबाबत फडणवीस यांची पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहेत. सत्तरी ओलांडलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न देता नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, असा भाजपचा विचार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, मंगलप्रभात लोढा आदी ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासंदर्भातही विचारविनिमय सुरू आहे.

वादग्रस्त नावांवरून गोंधळ

भाजपने अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाला आक्षेप घेतला आहे. गेल्या मंत्रिमंडळातील कामगिरी समाधानकारक नसून अन्यही काही कारणे त्यासाठी आहेत. तरीही यापैकी काही मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याचा शिंदे यांचा प्रस्ताव आहे. शिवसेनेतील कोणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी द्यायची, यावरूनही गोंधळ असून अनेक नेत्यांनी शिंदे यांची भेट घेऊन मंत्रीपदाची मागणी केली आहे.

follow us