‘लग्नासाठी सरकारने मदत करावी’; सोलापुरात तरुणाचा ठिय्या, 1 लाखांच्या अनुदानाची मागणी

मागण्यांचा डिजिटल बोर्डही आंदोलनस्थळी लावला असून त्यामुळे जिल्हा परिषद परिसरात या ‘भावी नवरदेवा’च्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Untitled Design   2026 09 10T174501.256

Untitled Design 2026 09 10T174501.256

The government should provide assistance for the wedding : सध्या ग्रामीण महाराष्ट्रात तरुणांच्या लग्नाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याची चर्चा आहे. अनेक गावांमध्ये वयाची पस्तिशी ओलांडल्यानंतर देखील तरुणांचे विवाह जुळत नसल्याने हा प्रश्न केवळ संबंधित युवक किंवा त्याच्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता सामाजिक विषय बनत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वाढलेल्या अपेक्षा, विवाहयोग्य मुलींची तुलनेने कमी संख्या, नवरदेवाला सरकारी किंवा स्थिर नोकरी असावी अशी अपेक्षा यांसारख्या कारणांमुळे ग्रामीण भागातील अनेक तरुणांना लग्न जुळवताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील एका तरुणाने थेट सरकारकडेच लग्नासाठी मदतीची मागणी करत अनोखे आंदोलन सुरू केले आहे.

ग्रामीण भागातील युवकांच्या विवाहाचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यावा, या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील कुरुल गावातील किसनदेव ननवरे हा तरुण सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाला बसला आहे. विशेष म्हणजे त्याच्या आंदोलनाची पद्धतही लक्ष वेधून घेणारी आहे. डोक्यावर नवरदेवाचा फेटा आणि मुंडावळ्या बांधून किसनदेवने जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मांडला आहे. आपल्या मागण्यांचा डिजिटल बोर्डही त्याने आंदोलनस्थळी लावला असून त्यामुळे जिल्हा परिषद परिसरात या ‘भावी नवरदेवा’च्या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

किसनदेव ननवरेची प्रमुख मागणी म्हणजे राज्य सरकारने ग्रामीण भागातील विवाह इच्छुक तरुण-तरुणींसाठी स्वतंत्र सरकारी विवाह नोंदणी व्यवस्था निर्माण करावी. समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र सुरू करण्यात यावे आणि ही सुविधा ऑफलाइन तसेच ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने उपलब्ध करून द्यावी, अशी त्याची मागणी आहे. विवाह इच्छुक तरुण-तरुणींची अधिकृत नोंदणी झाल्यास योग्य स्थळ शोधण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होऊ शकते, अशी भूमिका या आंदोलनाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.

पुरावे माझ्याकडे, मग सरकार कारवाई का करत नाही? विवेक भीमनवारांच्या राजीनाम्यासाठी रोहित पवार आक्रमक

यासोबतच राज्यातील युवकांना विवाहासाठी सरकारने एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे, अशीही किसनदेव ननवरेची मागणी आहे. लग्नासाठी येणारा आर्थिक खर्च आणि ग्रामीण भागातील अनेक तरुणांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकारी विवाह नोंदणी केंद्रासोबतच एक लाख रुपयांच्या विवाह अनुदानाची मागणीही या आंदोलनामुळे चर्चेत आली आहे.

ग्रामीण भागात शेती, छोटा व्यवसाय किंवा इतर स्वरोजगार करणाऱ्या तरुणांना विवाहासाठी स्थळ शोधताना अनेक अडचणी येत असल्याची भावना व्यक्त केली जाते. दुसरीकडे अनेक मुली उच्चशिक्षित आणि नोकरी करणाऱ्या असल्यामुळे भावी जोडीदाराबाबत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. सरकारी नोकरी, स्थिर उत्पन्न आणि शहरातील वास्तव्य यासारख्या अपेक्षांमुळे गावात राहून शेती किंवा छोटा व्यवसाय करणाऱ्या काही युवकांसमोर विवाहाचा प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा केला जात आहे.

गुजरातपलीकडचा देश फक्त निवडणुका आल्यावरच आठवतो का? राज ठाकरे मोदी सरकारवर भडकले

स्त्री-पुरुष प्रमाणातील असमतोलाचाही मुद्दा या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित केला जात आहे. पूर्वी मुलगाच हवा, वंशाला दिवा हवा अशा मानसिकतेतून मुलींना दुय्यम स्थान देण्यात आले आणि स्त्री भ्रूणहत्येसारख्या घटना घडल्या. त्याचे सामाजिक परिणाम आज विवाहयोग्य वयातील पिढीला भोगावे लागत असल्याची चर्चा ग्रामीण भागात होत आहे. त्यात बदललेली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती तसेच विवाहाबाबतच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे हा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा बनल्याचे सांगितले जात आहे.

आतापर्यंत लग्न जमत नसल्याचा विषय बहुतांश वेळा व्यक्तिगत किंवा कौटुंबिक समस्या म्हणून पाहिला जात होता. मात्र, सोलापूरमधील या आंदोलनाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील अविवाहित तरुणांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. नवरदेवाचा फेटा आणि मुंडावळ्या बांधून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करणाऱ्या किसनदेव ननवरेने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. आता सर्वधर्मीय सरकारी विवाह नोंदणी केंद्र आणि युवकांना लग्नासाठी एक लाख रुपयांचे अनुदान देण्याच्या त्याच्या मागण्यांवर प्रशासन किंवा राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version