Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे धक्कादायक घटना घडली. एका महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. (Sambhajinagar) पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक करुन, प्रकरणाचा उलगडा केला आहे. आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. मात्र, त्यांनी किर्तनकार महिलेची हत्या केली.
ही हत्या कोणी व का केली असे प्रश्न निर्माण झाले असताना मृत कीर्तनकाराचे वडील अण्णासाहेब पवार यांनी काही माहिती दिली होती. ते म्हणाले होते, जमिनिच्या वादातून संगीता पवार यांची हत्या झाली. 14 एप्रिल रोजी विरगाव पोलीस ठाण्यात शेजारच्या चौधरी कुटुंबाच्या विरोधात त्यांनी तक्रारही दिली. त्यांच्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचा देखील उल्लेख त्यांनी केला होता. त्यानंतर संगीता पवार यांची हत्या झाल्याचं त्यांचे वडील अण्णासाहेब पवार म्हणाले होते.
केबिनमध्ये बोलावून, बीड विनयभंग प्रकरणातल्या विजय पवारचा आणखी एक कारनामा समोर
मृताच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार देखील पोलीसांनी तपास करत या प्रकरणामध्ये चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः लक्ष घालून आरोपीचा शोध घेत होते. अखेर, या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी अटक केलेले आरोपी परप्रांतीय मजूर आहेत. ते रोजगारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. शहरात आल्यानंतर ते कर्जबाजारी झाले. त्यामुळे त्यांनी चोरी करण्याचा निर्णय घेतला.
चिंचडगाव येथील मंदिरात त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संगीता पवार यांचा त्यांनी खून केला. घटनेनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी दोघांनाही पकडले. एका आरोपीला मध्यप्रदेशातून अटक केली. तर दुसरा आरोपी वैजापूरमध्ये सापडला. पोलिसांनी मंदिरातील चोरी केलेले देवीचे दागिने आणि दानपेटी जप्त केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.