…तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर उघडं पाडू; सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं

भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे समोर आल्यास याचप्रमाणे कठोर आदेश दिले जातील, असा इशाराही न्यायालयाने दिला.

News Photo   2026 07 11T210512.824

...तर आम्ही तुम्हाला जनतेसमोर उघडं पाडू; सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं

राज्य सरकार जामीन अर्जांना जोरदार (SC) विरोध करते, मात्र फौजदारी खटल्यांची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलत नाही. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या खंडपीठासमोर एका परदेशी नागरिकाच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. त्यावेळी न्यायालयाने हे विधान केलं आहे. तसंच, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. तुम्हाला जनतेसमोर उघडं पाडू अशा कठोर शब्दात फटकारलं आहे.

महाराष्ट्रातील अशा प्रकारची प्रकरणं दररोज येत आहेत. तुम्ही जामीनाला जोरदार विरोध करता, पण खटल्यांची सुनावणी वेगाने होण्यासाठी कोणतीही प्रभावी पावलं उचलत नाही. जेव्हा आम्ही प्रकरणाची तपासणी करतो, तेव्हा पुरावे कमकुवत असल्याचं दिसतं. त्यामुळं आम्ही तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू असं सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

अपहरण आणि खून प्रकरणातील एका आरोपीने न्यायालयाला सांगितलं की, तो गेली चार वर्षे तुरुंगात असून त्याचा खटला ट्रायल कोर्टात 86 वेळा लिस्टेड झाला होता. त्याने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, त्याला 53 वेळा न्यायालयातच हजर करण्यात आलं नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाने ही बाब महाराष्ट्र सरकारची गंभीर चूक असल्याचं म्हटलं आहे.

आरोपीला जलदगतीने खटल्याची सुनावणी मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार असल्याचा उल्लेख करत खंडपीठाने म्हटलं की, आम्हाला याची लाज वाटते. चार वर्षांत 34 साक्षीदारांपैकी केवळ दोन जणांचीच साक्ष नोंदवली गेली आहे. ही बाब काही काळापासून न्यायालयाला अस्वस्थ करत आहे. राज्य सरकार जामीन अर्जांना विरोध करत असेल, तर खटल्याची सुनावणी सुरळीत आणि वेगाने पार पाडण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही.

महाराष्ट्र सरकारच्या वतीने हजर असलेल्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, आता राज्य सरकार प्रत्येक सुनावणीच्या दिवशी सर्व आरोपींना ट्रायल कोर्टात हजर करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना फौजदारी खटल्यांची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्यासाठी ठोस धोरण तयार करण्याची गरज असल्याचे नमूद केले. न्यायालयाने निर्देश दिले की, दर आठवड्याला किमान चार साक्षीदारांची साक्ष नोंदवावी आणि त्याची नोंद ट्रायल कोर्टासमोर सादर करावी. भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे समोर आल्यास याचप्रमाणे कठोर आदेश दिले जातील, असा इशाराही न्यायालयाने दिला.

Exit mobile version