Mahayuti : भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट हे तिन्ही पक्ष महायुतीच्या (Mahayuti) रुपात एकत्र असून सध्या सत्तेत आहेत. हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी त्यांच्यात अंतर्गत रस्सीखेच चालू असल्याचे बोललं जाते. महायुतीतील नाराजीही अनेकवेळा वेगवेगळ्या मार्गाने समोर आली आहे. दरम्यान, आता महायुतीचा एक नवा आणि महत्त्वाचा फॉर्म्यूला समोर आला आहे.
युतीतील काही नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली आहे, तर काही नेत्यांची नाराजी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समोर आलेली आहे. हीच नाराजी दूर करण्यासाठी राज्यातील वेगवेगळी महामंडळे फार महत्त्वाची भूमिका निभावत असतात. याच महामंडळाच्या वाटपाबाबत नवा फॉर्म्यूला समोर आला आहे. महायुतीत महामंडळ वाटप ठरले असून या सूत्रानुसार महामंडळ वाटप केले जाणार असल्याचं बोललं जात आहे.
राज्यपाल योग्य तेच बोलतात; मराठी हिंदी वादावरील राज्यपालांच्या वक्तव्याला फडणवीसांचं समर्थन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमधला महामंडळ वाटपाचा पेच अखेर सुटला आहे. संख्याबळानुसार महायुतीत महामंडळांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून पुढे आली आहे. यात महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपाच्या वाट्याला 44, शिंदेंच्या शिवसेनेला 33, तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 23 महामंडळ या सूत्रावर एकमत झाल्याचंही समोर आलं आहे.
लवकरच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे आज-माजी आमदार, विद्यमान तसेच माजी मंत्र्यांमधील नाराजी दूर करण्यासाठी लवकरच महामंडळाचे वाटप केलं जाऊ शकतं, असं सांगितले जात आहे. या महामंडळ वाटपातून महायुतीचे तिन्ही पक्ष आपापल्या नाराज नेत्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. राज्यात सिडको आणि म्हाडा यासारखी चर्चेत असलेली आणि महत्त्वाची समजली जातात. या महामंडळांसाठीही महायुतीच्या पक्षांत रस्सीखेच सुरू असल्याचे म्हटले जात आहे.