There is a stir after EVM was found at a dhaba in Mohol, Solapur : 7 फेब्रुवारी रोजी राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या किरकोळ घटना वगळता एकूणच मतदान शांततेत झाले. मात्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवरच संशयाची छाया निर्माण झाली आहे.
मोहोळ शहराजवळील एका ढाबा-हॉटेल परिसरात चक्क ईव्हीएम मशीन आढळून आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी केला आहे. काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करत उमेश पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन सीलबंद ईव्हीएम मशीन या हॉटेल परिसरात आढळून आल्या. जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर तसेच पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ईव्हीएम मशीन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत रीतसर पंचनामा केला असून त्या मशीन स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, उमेश पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मोहोळचे तहसीलदार तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, लोकांनी अडवलेल्या ईव्हीएम मशीन या राखीव मशीन असून त्यांचा मतदानासाठी कोणताही वापर झालेला नाही. या मशीन अद्यापही पूर्णपणे सीलबंद अवस्थेत आहेत.
