सोलापुरात पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तीन आमदार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर असून, महायुतीच्या स्थानिक नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Untitled Design 76

Untitled Design 76

Three MLAs from the Sharad Pawar faction meet senior BJP leaders : राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच सोलापुरातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सोलापूर दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत महायुतीच्या स्थानिक नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र या बैठकीपूर्वीच झालेल्या एका भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, उत्तम जानकर हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जातात. त्यामुळे या तिन्ही आमदारांची एकत्रित भेट राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील महायुतीच्या बैठकीला उपस्थित आहेत. अशा वेळी विरोधी पक्षातील आमदारांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र वसंतराव देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार उत्तम जानकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

महिलांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून कारवाई; प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीचे समन्स

इतकेच नव्हे, तर त्यांनी या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिकाही जाहीर केली होती. या पार्श्वभूमीवर आजची भेट अधिकच महत्त्वाची ठरत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटातील नाराज आमदारांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधल्याने विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीचा विधान परिषद निवडणुकीवर नेमका काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नाराजीचा फटका बसणार?

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वसंतराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर काही स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीची भावना उघडपणे दिसून आली आहे. त्यामुळे या नाराजीचा फटका निवडणुकीत पक्षाला बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेषतः उत्तम जानकर यांच्यासारख्या प्रभावी आमदारांची भूमिका आगामी मतदानाच्या समीकरणांवर परिणाम करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता या भेटीनंतर पुढे कोणत्या राजकीय हालचाली घडतात, याकडे सोलापूरसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version