महिलांबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून कारवाई; प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीचे समन्स

महाराष्ट्र सायबर विभागाने प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 75

Case registered against stand-up comedian Pranit More : स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच्या लाइव्ह शोमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणाला कायदेशीर वळण मिळाले आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह, अश्लील आणि महिलांचा अवमान करणारा मजकूर प्रसारित केल्याचा आरोप करत महाराष्ट्र सायबर विभागाने प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला असून तिघांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

या वादाची सुरुवात प्रणित मोरेच्या एका लाइव्ह स्टँडअप शोमधून झाली. प्रेक्षकांशी संवाद साधत असताना एका तरुणाने आपल्या डेटिंगचा अनुभव सांगताना एका तरुणीसोबत डेटला गेल्यानंतर चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर तो खर्च ‘वसूल’ करण्याची अपेक्षा असल्याचे वक्तव्य त्याने केले. हे बोलणे ऐकून सभागृहातील काही प्रेक्षकांसह प्रणित मोरेही हसताना दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संतापाची लाट उसळली. अनेकांनी या वक्तव्याला महिलांचा अपमान करणारे आणि महिलांविषयीची चुकीची मानसिकता दर्शवणारे असल्याचे म्हटले. सोशल मीडियावर हजारो प्रतिक्रिया उमटल्या आणि संबंधित तरुणाच्या मानसिकतेवर तसेच कार्यक्रमातील वातावरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

तुकाराम मुंढेंचा हंटर ! एकाच दिवसात 43 ठिकाणी छापेमारी; तब्बल कोट्यवधी रुपयांची सुपारी जप्त

याचदरम्यान प्रणित मोरेच्या आणखी एका शोमधील व्हिडिओही चर्चेत आला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या डॉ. सेजल पवार यांनी वैद्यकीय शिक्षणादरम्यान शरीरदान केलेल्या मृतदेहांबाबत, म्हणजेच कॅडेव्हर संदर्भातील अनुभव सांगताना एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी त्यावर तीव्र आक्षेप घेतला. हे वक्तव्य वैद्यकीय नैतिकतेला आणि व्यवसायाच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे असल्याची टीका करण्यात आली.

या दोन्ही व्हिडिओंमुळे निर्माण झालेल्या वादानंतर महाराष्ट्र सायबर विभागाने कारवाईची पावले उचलली असून प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉ. सेजल पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी आणि तपासानंतर या प्रकरणात आणखी कोणती कारवाई होते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us