बर्फवृष्टीतून सुखरूप बाहेर पडले, पण परतीच्या प्रवासात अपघात; पिंपरी-चिंचवडच्या तिघा तरुणांचा मृत्यू

राजस्थानमधील कोटा येथील दिल्ली-मुंबई महामार्गावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. कार पुलावरून खाली कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.

Untitled Design 50

Untitled Design 50

Three youths from Pimpri-Chinchwad die in an accident : लेह-लडाखला फिरायला गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तरुणांवर काळाने घाला घातला आहे. राजस्थानमध्ये झालेल्या भीषण अपघातात शहरातील तिघा तरुणांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

पिंपरी चिंचवडमधील थेरगाव, वाकड आणि म्हाळुंगे परिसरातील सुमारे दहा ते 12 तरुणांचा ग्रुप 27 तारखेला लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीर येथे फिरायला गेला होता. फिरून झाल्यानंतर बुधवारी सर्वजण पार्टीच्या प्रवासासाठी निघाले होते. मात्र राजस्थानमधील कोटा येथील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिल्ली-मुंबई महामार्गावर त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. कार पुलावरून खाली कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात कुणाल चोरडिया, मयुरेश पाडाळे आणि सिद्धांत आल्हाट यांचा मृत्यू झाला. मयुरेश आणि सिद्धांत हे दोघे उच्च शिक्षण घेत होते आणि वडिलांच्या व्यवसायात देखील मदत करत होते. तर कुणाल चोरडिया हा इंदिरा कॉलेजमध्ये बीबीए अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता. कुणालच्या मागे आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. दरम्यान, या तरुणांचा ग्रुप कारगिल परिसरात प्रचंड बर्फवृष्टीमुळे काही दिवस अडकला होता. बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने सुमारे 5 दिवस एकाच ठिकाणी थांबले होते. पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक नेत्यांनी बीएसएफ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले होते. मात्र सुखरूप परतत असतानाच राजस्थानमध्ये झालेल्या अपघाताने तिघांचे आयुष्य संपवले.

महसूल खात्यात इतिहासातील सगळ्यात मोठा घोटाळा झाल्याची महसूलमंत्री बावनकुळेंची कबुली

या अपघातग्रस्त मित्रांसोबत आणखी एक तरुण होता. मात्र मंगळवारी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो विमानाने घरी परतला होता. बुधवारी सकाळी अपघाताची बातमी समजताच त्याला मोठा मानसिक धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मृत तरुणांचे पार्थिव गुरुवारी सकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आणले जाणार आहे. राजस्थानमध्ये घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत आमदार शंकर जगताप यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला असून मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत केली जात असल्याची माहिती दिली आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version