मालेगावमध्ये पुन्हा पेटला टिपू सुलतान वाद; कार्यालयात पुन्हा फोटो लावणार असल्याचं उपमहापौरांचं वक्तव्य

मनपा प्रशासनाने शिष्टाचारानुसार शासकीय कार्यालयांत कोणत्या महापुरुषांचे फोटो लावावेत, याबाबत सर्व संबंधितांना पत्र दिल्याची माहिती.

Untitled Design 55 (2)

Untitled Design 55 (2)

Tipu Sultan controversy flares up again in Malegaon : संपूर्ण महाराष्ट्रात टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसत आहेत. या वादाची सुरूवात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातून झाली असून आता त्याला नव्या घडामोडींमुळे अधिक तीव्र वळण मिळण्याची शक्यता आहे. रविवारी रात्री मालेगावच्या किल्ला परिसरात उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या स्वागतासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भासहन करताना त्यांनी महापौर कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा कार्यालयात लावला जाईल, असं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी टिपू सुलतान यांचे देखील कौतुक केले. या विधानानंतर शहरातील वातावरण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळालं.

या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत भाजप जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी उपमहापौरांवर टीका केली. संविधानाच्या चौकटीत राहून विकासकामांसाठी जनतेने निवडून दिले असताना सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर भारतीय जनता पक्ष मालेगावात जनआंदोलन उभे करेल. हा हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न आहे. संबंधित फोटो लावल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट; रोहित पवारांचा दिल्लीतील गुप्तहेर संस्थेशी संपर्क

दरम्यान, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे तालुका अध्यक्ष राहुल माऊली बच्छाव यांनीही आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केल्याचा फोटो लावण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते, कारण त्यामुळे काहींच्या भावना दुखावल्या जातात. मग हजारो हिंदूंची कत्तल केल्याचा आरोप असलेल्या टिपू सुलतान यांचा फोटो शासकीय कार्यालयात लावण्याचा प्रयत्न का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, जर असा निर्णय घेतला गेला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या प्रकरणी मनपा प्रशासनाने शिष्टाचारानुसार शासकीय कार्यालयांत कोणत्या महापुरुषांचे फोटो लावावेत, याबाबत सर्व संबंधितांना पत्र दिल्याची माहिती आहे. कायद्यानुसार घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या वादावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, देशातील धार्मिक वाद तेव्हाच संपतील जेव्हा सर्व समाजघटकांचे महापुरुष आणि राष्ट्रीय प्रतीकांविषयी समान आदराची भावना असेल. टिपू सुलतान आमचा आदर्श असू शकत नाही. आपण आज जे आहोत ते शिवरायांमुळे आहोत. त्यांच्या योगदानाचा अनादर का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

एकूणच, उपमहापौरांनी मनपा कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्याचा निर्णय कायम ठेवला, तर त्याचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता प्रशासन आणि राजकीय नेतृत्व या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, तसेच कायदेशीर पातळीवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version