मुंबई : आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांचे आजोबा मालोजीराजे भोसले (Malojiraje Bhosale) यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे (Pune)जिल्ह्यातील इंदापूर (Indapur)तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजीराजे यांच्या गडीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागाकडून (Department of Tourism)दोन कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहे. तसेच या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)यांनी विधानसभेतील (Assembly)लक्षवेधी प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली.
इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी याबाबत विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात वास्तव्य केलेला भुईकोट किल्ला (जुनी तहसील कचेरी) हा प्रशासकीय दृष्टीनं महसूल विभागाकडं दप्तरी नोंद आहे.
फडणवीसांनी केली घोषणा अन् धनंजय मुंडेंनी मानले आभार
महसूल विभागाच्या नोंदीमध्ये मालोजीराजांच्या इतिहासाच्या बाबींचा उल्लेख आहे. इतिहासाची साक्ष असणाऱ्या या ऐतिहासिक जुनी तहसील कचेरी म्हणजेच मालोजीराजांच्या गडीचं संवर्धन करुन जुने बुरुंज, गाव, वेस, बुधरे यांचे पुनर्जीवन करुन या कचेरीच्या जागेतच छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारावे, दुकानांसाठी तसेच मालोजीराजे यांच्या पादुकांसाठीही दगडी मूळ स्वरूपाचा चबुतरा उभारून, त्यांचे जीवन चरित्र महाराष्ट्र समोर आणण्यासाठी पर्यटन विभागाकडून प्रयत्न करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे.
याविषयी राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सकारात्मक निर्णय घेतला असून, या गडीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागामार्फत दोन कोटी रुपये मंजूर करण्यात येतील. तसेच दोन महिन्याच्या आत गढीवर सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन हा विषय तडीस नेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
तसेच हे स्थळ सात दिवसांच्या आत पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात येईल या ठिकाणच्या वास्तूची देखभाल ज्या विभागाकडं असेल त्यांच्या समन्वयानं तेथील अतिक्रमणे काढण्यात येणार असल्याचंही पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं. तसेच या विषयाच्या अनुषंगानं संबधित विभागांची लवकरच बैठक घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचंही यावेळी सांगितलं आहे.