मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 23 व 24 एप्रिलला वाहतूक बंद, एक्सप्रेसवेवरील पुलाच्या कामासाठी ट्राफिक डायव्हर्जन

या कालावधीत प्रवासी वाहनांसह सर्व प्रकारची वाहने किवळे, देहूरोड आणि तळेगाव या मार्गांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वळवण्यात येतील.

Untitled Design 18

Untitled Design 18

Traffic closed on April 23 and 24 : मुंबई-पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि तितकीच उपयुक्त सूचना समोर आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुढील दोन दिवसांसाठी नियोजित देखभाल कामांमुळे तात्पुरता मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, काही वेळेसाठी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करून मार्गस्थ होणे गरजेचे ठरणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, डोंगरगाव-कुसगाव (कि.मी. 58/500) येथील महत्वाच्या पुलावर दुरुस्ती आणि रंगकामाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे पुलाची संरचनात्मक तपासणी, आवश्यक दुरुस्ती, तसेच सुरक्षेसाठी रंगकाम आणि चिन्हांकनाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 एप्रिल रोजी दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत प्रत्येकी 3 तसंच मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

23 एप्रिल रोज्जी म्हणजे गुरुवारी 12 ते 3 या वेळेत मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या कालावधीत प्रवासी वाहनांसह सर्व प्रकारची वाहने किवळे, देहूरोड आणि तळेगाव या मार्गांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वळवण्यात येतील. त्यानंतर कुसगाव टोल प्लाझामार्गे ही वाहने पुन्हा मुंबईच्या दिशेने सोडण्यात येतील. या पर्यायी मार्गावर काही प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी संयम बाळगणे आवशयक आहे.

तसेच 24 एप्रिल रोजी म्हणजेच शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या वेळेत कुसगाव टोल प्लाझामार्गे वाहने राष्ट्रीय महामार्ग 48 वर वळवून देहूरोड आणि किवळे मार्गे पुण्याकडे पाठवली जातील. या मार्गावर स्थानिक वाहतूक देखील असल्यामुळे काही ठिकाणी संथ गतीने वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या मेगाब्लॉकमुळे संबंधित वेळेत प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणि प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते. विशेषतः दुपारच्या वेळेत उन्हाचा तीव्र परिणाम जाणवत असल्याने प्रवाशांनी पाण्याची बाटली, आवशयक औषधे आणि इतर गरजेच्या वस्तू सोबत ठेवाव्यात, असे देखील प्रशासनाने सूचित केले आहे. शक्य असल्यास या वेळेत प्रवास टाळणे किंवा सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा प्रवास करणे हा पर्याय अधिक सोयीचा ठरू शकतो.

दरम्यान, प्रवासादरम्यान काही अडचण निर्माण झाल्यास मदतीसाठी नियंत्रण कक्ष (9822498224) तसेच महामार्ग पोलीस (9833498334) यांच्याशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्थापनासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.

हा मेगाब्लॉक तात्पुरता असला तरी अत्यावश्यक देखभाल आणि सुरक्षेच्या दृष्टीने तो महत्वाचा असल्याचे एमएसआरडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कामांमुळे भविष्यातील प्रवास अधिक सुरक्षित, सुरळीत आणि जलद होण्यास मदत होणार आहे. यामुळे प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करत संयम राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version