Sunny Nimhan : औंध येथील महादजी शिंदे रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत वेस्टर्न मॉलला औंध डीपी रोडशी थेट जोडणाऱ्या नव्या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे वेस्टर्न मॉलमध्ये खरेदी, मनोरंजन किंवा चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पुण्याकडे जाण्यासाठी अधिक सुलभ आणि पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे. नव्या मार्गाचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या हस्ते आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे,पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेविका भक्ती गायकवाड,यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यापूर्वी वेस्टर्न मॉलमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांना महादजी शिंदे रस्त्यावर येऊन भाले चौक परिसरात यू-टर्न घेऊन शहराच्या दिशेने जावे लागत होते. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून तसेच वेस्टर्न मॉल व्यवस्थापनाच्या सहकार्याने मॉलच्या भिंतीचा आवश्यक भाग खुला करून वेस्टर्न मॉलला थेट औंध डीपी रोडशी जोडणारा मार्ग विकसित करण्यात आला. त्यामुळे आता मॉलमधून बाहेर पडणारी पुण्याकडे जाणारी वाहने महादजी शिंदे रस्त्यावर न येता थेट डीपी रोडमार्गे पुढे जाऊ शकणार आहेत.
या नव्या वाहतूक व्यवस्थेमुळे वेस्टर्न मॉलमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांपैकी सुमारे २५ ते ३० टक्के वाहने महादजी शिंदे रस्त्याऐवजी औंध डीपी रोडचा वापर करतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी महादजी शिंदे रस्त्यावरील वाहतूक भार लक्षणीयरीत्या कमी होऊन परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांचा वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे.
याबाबत बोलताना नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले, “वाहतूक समस्येवर उपाय म्हणून केवळ नवीन रस्ते उभारणे आवश्यक नसते. योग्य नियोजन, वाहतूक अभियांत्रिकीचा प्रभावी वापर आणि संबंधित घटकांमधील समन्वयाच्या माध्यमातूनही वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय शोधता येतात. या उपक्रमातून त्याचेच उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे.”
विधानपरिषद बिनविरोध! धुळफेक बंद करा…छुपा पाठींब्यावरून रूपवतेंचा आघाडीवर हल्लाबोल
या उपक्रमासाठी सहायक पोलीस आयुक्त मनोजजी पाटील, नगरसेवक सनी विनायक निम्हण तसेच वेस्टर्न मॉल व्यवस्थापन यांनी पुढाकार घेऊन आवश्यक समन्वय साधला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रकल्प अल्पावधीत प्रत्यक्षात साकार झाला. परिसरातील वाहतूक व्यवस्थापनासाठी हा उपक्रम सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण आणि परिणामकारक ठरणार असून नागरिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.
